India vs Pakistan highlights Cricket Score, Asia Cup 2025 Super 4 : आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर फेरीच्या लढतीत भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६ विकेट्सनी विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेलं १७२ धावांच्या लक्ष्यासमोर खेळताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी तडाखेबंद सलामी दिली. याच भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला.

Live Updates
00:06 (IST) 22 Sep 2025

भारतीय संघाचा शानदार विजय

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावांची मजल मारली. साहिबाजादा फरहान आणि सईम अय्युब यांची भागीदारी पाकिस्तानसाठी मोलाची ठरली. फरहानने अर्धशतक साजरं केलं. मोहम्मद नवाझ, सलमान अली अघा आणि फहीम अशरफ यांनी छोट्या उपयुक्त खेळी केल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी १०५ धावांची दणदणीत सलामी दिली. दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा पुरेपूर समाचार घेतला. गिलने २८ चेंडूत ८ चौकारांसह ४७ धावांची खेळी केली. अभिषेकने मैदानभर फटके लगावत ३९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. अभिषेक बाद झाल्यानंतर भारतीय संघाने सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन यांना झटपट गमावलं. पण तिलक वर्माने १९ चेंडूत नाबाद ३० धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

00:02 (IST) 22 Sep 2025

टीम इंडियाचा दिमाखदार विजय

तिलक वर्मा शाहीन शहा आफ्रिदीच्या गोलंदाजीवर षटकार आणि चौकार लगावत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

23:48 (IST) 21 Sep 2025

संजू सॅमसन तंबूत

विजय दृष्टिक्षेपात असताना हारिस रौफच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन बाद झाला. त्याने १३ धावा केल्या.

23:27 (IST) 21 Sep 2025

अभिषेक शर्माची फटकेबाजी थांबली

चौकार, षटकारांची आतषबाजी करणाऱ्या अभिषेक शर्माला अबरार अहमदने बाद केलं. त्याने ३९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावांची खेळी साकारली.

23:16 (IST) 21 Sep 2025

कर्णधार सूर्यकुमार यादव माघारी

हारिस रौफच्या गोलंदाजीवर फाईनलेग क्षेत्रात फटका लगावण्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा प्रयत्न थर्डमॅनला अबरार अहमदच्या हातात जाऊन विसावला.

23:15 (IST) 21 Sep 2025

शुबमन गिल तंबूत

दुखापतीमुळे उपचार घ्यावे लागलेला शुबमन गिल या विश्रांतीनंतर लगेचच तंबूत परतला. त्याने ४७ धावांची खेळी केली.

23:01 (IST) 21 Sep 2025

टीम इंडियाची शंभरी

शुबमन गिल आणि अभिषेक शर्माच्या तडाखेबंद फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने नवव्या षटकातच शंभरी पार केली आहे.

22:56 (IST) 21 Sep 2025

अभिषेक शर्माचं अर्धशतक

सईम अय्युबच्या गोलंदाजीवर सुरेख चौकार लगावत अभिषेक शर्माने २४ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केलं.

22:50 (IST) 21 Sep 2025

भारतीय संघाने उठवला पॉवरप्लेचा फायदा

भारतीय संघाने पॉवरप्लेच्या ६ षटकांचा पुरेपूर फायदा उठवत ६९ धावा चोपल्या. सातत्याने चौकार वसूल करत गिल-शर्मा जोडीने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

22:42 (IST) 21 Sep 2025

टीम इंडियाची पन्नाशी पार

अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलच्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने पाचव्या षटकात पन्नाशी पार केली.

22:30 (IST) 21 Sep 2025

अभिषेक-शुबमनची वेगवान सुरुवात

अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारतीय संघाला खणखणीत सुरुवात करून दिली आहे.

22:04 (IST) 21 Sep 2025

पाकिस्तानने केलं पुनरागमन

प्राथमिक फेरीत सर्वसाधारण खेळ करणाऱ्या पाकिस्तानने आज मात्र आक्रमक फटकेबाजीवर भर दिला. फखर झमान बाद झाल्यानंतर साहिबजादा फरहान आणि सईम अय्युब यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. शिवम दुबेने दोघांनाही बाद करत पाकिस्तानच्या फटकेबाजीला वेसण घातली. मोहम्मद नवाझ (२१), सलमान अघा (१७) आणि फहीम अशरफ (२०) यांनी उपयुक्त खेळी केल्या. पाकिस्तानने १७१ धावांची मजल मारली. भारतातर्फे शिवम दुबेने २ विकेट्स पटकावल्या. भारतीय खेळाडूंनी तीन झेल सोडले.

21:59 (IST) 21 Sep 2025

पाकिस्तानने भारताला दिलं १७२ धावांचं लक्ष्य

साहिबजादा फरहानचं अर्धशतक आणि त्याला बाकी फलंदाजांनी केलेल्या छोट्या उपयुक्त खेळींच्या बळावर पाकिस्तानने भारताविरुद्ध १७१ धावांची मजल मारली. फरहानने ४५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५८ धावांची खेळी केली.

21:52 (IST) 21 Sep 2025

सूर्यकुमारचा हुशारीने थ्रो, नवाझ माघारी

चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोहम्मद नवाझला क्रीझमध्ये नसल्याचं लक्षातच आलं नाही. सूर्यकुमार यादवच्या अफलातून थ्रोने त्याची खेळी संपुष्टात आणली.

21:42 (IST) 21 Sep 2025

नवाझचे दोन चौकार

धावगती मंदावलेल्या पाकिस्तानच्या डावाला मोहम्मद नवाझने दोन चौकार लगावून ऊर्जितावस्था आणली. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर नवाझने हे चौकार वसूल केले.

21:25 (IST) 21 Sep 2025

शिवम दुबेच्या गोलंदाजीवर फरहान परतला तंबूत

शिवम दुबेने पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानसाठी अर्धशतक झळकावणाऱ्या फरहानला शिवम दुबेने बाद करत माघारी धाडलं आहे.

21:22 (IST) 21 Sep 2025

कुलदीपने दिला पाकिस्तानला तिसरा धक्का! हुसेन तलत परतला तंबूत

पाकिस्तानला तिसरा मोठा धक्का बसला आहे. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने हुसेन तलतला १० धावांवर बाद करत माधारी धाडलं आहे.

21:17 (IST) 21 Sep 2025

IND vs PAK: इतके सोपे कॅच कोण सोडतं? आधी अभिषेक अन् नंतर कुलदीपनेही केली तीच चूक

India vs Pakistan, Asia Cup 2025: या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय खेळाडूंनी सुरूवातीलाच २ सोपे झेल सोडले. ...अधिक वाचा
21:03 (IST) 21 Sep 2025

शिवम दुबेने मिळवून दिला ब्रेकथ्रू; अभिषेकचा सुरेख झेल

शिवम दुबेने पहिल्याच षटकात उसळत्या चेंडूवर सईम अय्युबला बाद करत भारताला यश मिळवून दिलं. डावाच्या सुरुवातीला झेल हातून सुटलेल्या अभिषेकने या खेपेस मात्र संयमी झेल टिपला. सईमने २१ धावा केल्या.

20:57 (IST) 21 Sep 2025

पाकिस्तानची जोरदार फटकेबाजी

पाकिस्तानने १० षटकात ९१ धावांची मजल मारली आहे. फखर झमान बाद झाल्यानंतर सईम अय्युब आणि साहिबजादा फरहान यांनी सातत्याने चौकार, षटकार लगावत डावाला आकार दिला. साहिबजादाने अर्धशतकही पूर्ण केलं.

20:54 (IST) 21 Sep 2025

साहिबजादा फरहानचं अर्धशतक

अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचत साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण केलं.

20:52 (IST) 21 Sep 2025

कुलदीपच्या गोलंदाजीवर दोन षटकार

सईम अय्युब आणि साहिबजादा फरहान यांनी कुलदीप यादवच्या फिरकीविरुद्ध दोन खणखणीत षटकार खेचले. आठवडाभरापूर्वी झालेल्या लढतीत कुलदीपविरुद्ध खेळताना स्वीपचा फटका लगावल्यामुळे पाकिस्तानने विकेट्स गमावल्या होत्या.

20:47 (IST) 21 Sep 2025

साहिबजादा फरहानची जोरदार फटकेबाजी

साहिबजादा फरहानने वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर मारलेला फटका अभिषेक शर्माच्या हाताला लागून सीमारेषेपलीकडे गेला.

20:43 (IST) 21 Sep 2025

बुमराहचं महागडं षटक

टीम इंडियाचं प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराहच्या तीन षटकात पाकिस्तानने ३४ धावा वसूल केल्या.

20:34 (IST) 21 Sep 2025

सईम अय्युबला जीवदान

सलामीला येण्याऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सईम अय्युबला जीवदान मिळाले. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर सईमने खेळलेला फटका फाईनलेगच्या दिशेने गेला. कुलदीप यादव सहज झेल टिपणार अशी परिस्थिती होती मात्र कुलदीपच्या हातून चेंडू निसटला.

20:32 (IST) 21 Sep 2025

फखरच्या विकेटवरून वासिम अक्रमही नाराज

'थर्ड अंपायरने फखर झमानला बाद देताना सगळ्या कोनातून रिप्ले पाहायला हवा होता. चेंडू टप्पा पडून संजूच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला. तो थेट ग्लोव्हजमध्ये गेला यासाठी समाधानकारक पुरावा थर्ड अंपायरकडे नव्हता', असं पाकिस्तानचे माजी कर्णधार वासिम अक्रम यांनी कॉमेंट्रीदरम्यान सांगितलं.

20:29 (IST) 21 Sep 2025

बुमराह भरकटला

शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध जसप्रीत बुमराह आज थोडा भरकटलेला वाटत आहे. बुमराहच्या हातून सुटलेल्या फुलटॉसवर फरहानने चौकार लगावला. हा चेंडू नोबॉल असल्याचंही स्पष्ट झालं. बुमराहने फ्री हिटवर फरहानला एकच धाव घेऊ दिली.

20:24 (IST) 21 Sep 2025

फखर झमान नाराज

हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने यष्टीपाठी चांगला झेल टिपला. डावा गुडघा वाकवून संजूने दोन्ही ग्लोव्हज योग्य वेळेत खाली आणत चेंडू टिपला. मात्र चेंडू एक टप्पा पडून संजूच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला असं फखर झमानला वाटलं. त्यामुळे थर्ड अंपायर रुचिरा पल्लिरागुरुगे यांनी आऊटचा निर्णय देताच फखरने नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचे माजी गोलंदाज वकार युनिस यांनीही या निर्णयावर नाराजी दर्शवली.

20:18 (IST) 21 Sep 2025

फखर झमान माघारी, संजू सॅमसनचा उत्तम झेल

पाकिस्तानचा अनुभवी सलामीवीर फखर झमान हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. जोरदार फटकेबाजीसाठी प्रसिद्ध फखरने हार्दिकचा चेंडू खेळून काढला, पण त्यानंतर चेंडू यष्टींपाठी संजू सॅमसनच्या ग्लोव्ह्जमध्ये जाऊन विसावला. चेंडूचा जमिनीला स्पर्श झालेला नाही हे पंचांनी पडताळलं आणि निर्णय दिला.

20:11 (IST) 21 Sep 2025

पाकिस्तानची आक्रमक सुरुवात

डावखुरा अनुभवी सलामीवीर फखर झमानने जसप्रीत बुमराहच्या दोन चेंडूंवर दोन चौकार लगावत इरादे स्पष्ट केले.