टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये उद्या म्हणजेच रविवारी २४ ऑक्टोबर २०२१ रोजी भारत आपला पहिला सामना खेळणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानविरोधातील सामन्याने भारत या स्पर्धेमध्ये पुन्हा जेतेपद जिंकण्यासाठीची मोहीम सुरु करणार आहे. नेहमीप्रमाणे या सामन्याकडे संपूर्ण क्रीडा विश्वाची नजर लागलेली असतानाच दुबईमध्ये होणाऱ्या या सामन्याच्या काळामध्ये सट्टा बाजारामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

न्यूज १८ ने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या सामन्यावर एक हजार कोटींचा सट्टा लावण्यात आलाय. विशेष म्हणजे या सट्टेबाजीत भारत सामना जिंकेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. नाणेफेक झाल्यानंतर लगेचच या सामन्यावर सट्टा लावणाऱ्यांचं प्रमाण वाढेल आणि एकूण सट्टा १५०० ते २००० कोटींचा लावला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुबईमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात सट्टेबाजी करणारे बुकी उपस्थित आहे. एका बुकीने नाव न छापण्याच्या अटीवर सट्टाबाजारात सध्या काय दर चालला आहे आणि सट्टा लावणाऱ्यांचा आवडता संघ कोणता आहे याबद्दलची माहिती दिलीय. भारताचा दर हा ५७ ते ५८ रुपये इतका आहे. ऑलाइन बेटिंग साईट्सच्या माध्यमातूनही सट्टा लावला जात आहे. लहान मोठ्या सर्वच स्तरावरील सट्टेबाज या सामन्यावर कोट्यावधीचा सट्टा लावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे भ्रष्टाचारविरोधी पथकाचे बडे अधिकारी सध्या दुबई आणि आबूधाबीमध्ये आहेत. ते तेथील सर्व सामन्यांवर नजर ठेऊन आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. “आमचे अधिकारी आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणा प्रत्येक हलचालीवर लक्ष ठेऊन आहोत. यामध्ये खेळाडूंच्या सुरक्षेपासून इतर गोष्टींचाही समावेश आहे,” असं या अधिकाऱ्याने सांगितलं. या अधिकाऱ्यांनी किती रक्कमेचा सट्टा या सामन्यावर लावला जाईल याबद्दल प्रतिक्रिया देणं टाळलं. ऑनलाइन बेटिंग करणाऱ्या अनेक वेबसाईट्सवर सायबर क्राइमच्या तुकड्यांची नजर आहे. यापैकी अनेक वेबसाईट्सचा कारभार भारताच्या बाहेरुन चालतो. मात्र या साईटवरुन कोट्यावधींचा सट्टा लावला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि पाकिस्तानचा सामना दुबईमध्ये होणार असल्याने अंडरवर्ल्डचाही या सट्टेबाजीमध्ये हात असणार. अंडरवर्ल्डमधील अनेकांना क्रिकेटचं वेड असून खास करुन भारत पाकिस्तान सामन्यांवर सट्टा लावण्याच प्रमाण अधिक आहे. वेगवेगळ्या पद्धतीने हा सट्टा लावला जातो आणि सामन्या निकालानुसार नंतर पैसा वाटून दिला जातो. जेव्हा मोठ्या प्रमाणात सामन्यावर पैसे लावण्यात आलेले असतात तेव्हा सामना फिक्स केला जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळेच आयसीसी आणि बीसीसीआयचे अधिकारी सर्व खेळाडूंवर नजर ठेऊन असतात.