रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने सुसाट वेग धारण करत आपला विजयीरथ पुढे हाकला आहे. वेस्ट इंडीजनंतर भारताने श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिकाही जिंकली आहे. धर्मशाला येथे खेळला गेलेला दुसरा टी-२० सामना भारताने ७ गडी राखून जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज पाथुम निसांकाचे दमदार अर्धशतक आणि कप्तान दासुन शनाकाच्या वादळी ४७ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकात ५ बाद १८३ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात भारताकडून श्रेयस अय्यर (नाबाद ७४), संजू सॅमसन (३९) आणि रवींद्र जडेजा (१८ चेंडूत नाबाद ४५) यांनी धुवांधार फलंदाजी करत श्रीलंकेचे आव्हान १७.१ षटकातच पूर्ण केले. श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा डाव

इशान किशन (१६) आणि रोहित शर्मा (१) यांना भारताला चांगली सुरुवात करून देता आली नाही. लंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने रोहितला बोल्ड केले, तर लाहिरू कुमाराने इशानचा अडथळा दूर केला. यानंतर मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने आपला उत्तम फॉर्म कायम राखत फलंदाजी केली. त्याला प्रथम संजू सॅमंसनची साथ लाभली. या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. आक्रमक रुप धारण केलेल्या सॅमसनला कुमाराने झेलबाद केले. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या बिनुरा फर्नांडोने त्याचा अप्रतिम झेल घेतला. सॅमसनने २५ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३९ धावा केल्या. दरम्यान अय्यरने अर्धशतक पूर्ण केले. सॅमसननंतर मैदानात आलेल्या रवींद्र जडेजाने १८ चेंडूत नाबाद ४५ ठोकत भारताचा विजय सोपा केला. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि एक षटकार ठोकला. तर अय्यरने ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७४ धावांची खेळी केली. १७.१ षटकातच भारताने हे आव्हान पूर्ण केले.

श्रीलंकेचा डाव

पाथुम निसांका आणि दानुषका गुणातिलका यांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६७ धावा जोडल्या. फिरकीपटू रवींद्र जडेजाने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने गुणातिलकाला व्यंकटेश अय्यरकरवी झेलबाद केले. गुणातिलकाने ४ चौकार आणि २ षटकारांसह ३८ धावा केल्या. त्यानंतर लंकेने मधल्या फळीत चरिथ असलांका (२), कामिल मिशारा (१) आणि दिनेश चंडीमल (९) यांना स्वस्तात गमावले. त्यानंतर निसांकाने श्रीलंकेचा कप्तान दासुन शनाकासोबत अर्धशतकी भागीदारी रचली. दरम्यान निसांकाने अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात भुवनेश्वर कुमारने त्याला पायचीत पकडले. निसांकाने ११ चौकारांसह ७५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. २० षटकात श्रीलंकेने ५ बाद १८३ धावा केल्या. शनाकाने १९ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ४७ धावांची खेळी करत लंकेला सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली.

या सामन्यापूर्वी भआरतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड़ मालिकेबाहेर गेला असून त्याच्या जागी मयंक अग्रवालला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर श्रीलंका संघाचे कुशल मेंडिस आणि फिरकीपटू महिश तीक्ष्णा हे देखील हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. डिसेंबर २००९ पासून श्रीलंकेच्या संघाने भारताविरुद्ध ४ वेळा टी-२० मालिका खेळली आहे, परंतु आजपर्यंत त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही.

हेही वाचा – रणजी क्रिकेट : आपल्या एक दिवसाच्या चिमुकलीच्या निधनानंतरही तो मैदानात उतरला अन् त्याने शतक झळकावलं

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, यजुर्वेंद्र चहल

श्रीलंका : पाथुम निसांका, कामिल मिशारा, चरिथ असलांका, दानुष्का गुणातिलका, दिनेश चंडिमल (यष्टीरक्षक), दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा, बिनुरा फर्नांडो, लाहिरू कुमारा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs sri lanka 2nd t20 match report adn
First published on: 26-02-2022 at 18:33 IST