वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मायदेशातील नव्या हंगामाची दमदार सुरुवात करणाऱ्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सातत्यपूर्ण कामगिरीचे ध्येय बाळगले असून वेस्ट इंडिजविरुद्ध आज, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही यजमानांचाच दबदबा अपेक्षित आहे. राजधानी दिल्लीत होणाऱ्या या सामन्याची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असेल असा अंदाज आहे. अशात अननुभवी विंडीज गोलंदाजांसमोर मोठी धावसंख्या उभारण्याची भारतीय फलंदाजांकडे सुवर्णसंधी आहे.
विंडीजचा संघ गेल्या काही वर्षांपासून अपयशाच्या गर्तेत अडकला असून या मालिकेतील पहिल्या कसोटीत त्यांना भारतीय संघाला किमान झुंजही देता आली नाही. भारतीय संघाने अहमदाबाद येथे झालेल्या या कसोटीत केवळ अडीच दिवसांत एक डाव आणि १४० धावांनी विंडीजचा धुव्वा उडवला. आता हेच चित्र फिरोझ शाह कोटला येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतही कायम राहण्याचीच शक्यता अधिक आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकून मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्यासह जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेत बहुमूल्य गुण मिळवण्याची संधी आहे. पुढील महिन्यात भारतीय संघाला मायदेशात ‘डब्ल्यूटीसी’ विजेत्या दक्षिण आफ्रिकेला सामोरे जायचे आहे. त्यापूर्वी भारतीय संघ खेळातील उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करेल.
कर्णधार शुभमन गिलसह केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा असे भारताचे सर्वच फलंदाज लयीत आहेत. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तिसऱ्या क्रमांकासाठी पसंती देण्यात आलेल्या साई सुदर्शनला आपली निवड अद्याप सार्थ ठरवता आलेली नाही. त्यामुळे त्याचा कामगिरी उंचावण्याचा मानस असेल. भारतीय संघ यानंतर मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे तो विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटीतही खेळणे अपेक्षित आहे.
वेळ : सकाळी ९.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.
साई सुदर्शनवर दडपण
निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या क्रमांकासाठी साई सुदर्शनला पसंती दिली आहे. मात्र, अद्याप त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. छोटेखानी कसोटी कारकीर्दीत चार सामन्यांच्या सात डावांत त्याला केवळ २१च्या सरासरीने १४७ धावाच करता आल्या आहेत. यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे. विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीत अन्य भारतीय फलंदाज मोठ्या खेळी करत असताना साईला अवघ्या सात धावा करता आल्या. त्यामुळे त्याच्यावर कामगिरी उंचावण्यासाठी दडपण असेल. फिरोझ शाह कोटला स्टेडियमच्या खेळपट्टीवर तिसऱ्या दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे. त्यामुळे कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी त्रिकुटाची भूमिका महत्त्वाची ठरेल.
विंडीजकडून प्रतिकाराची अपेक्षा
पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ सपशेल अपयशी ठरला. त्यानंतर विंडीज संघावर, विशेषत: फलंदाजांना बरीच टीका करण्यात आली. सर व्हिव्हियन रिचर्ड्स, ब्रायन लारा आणि सर रिची रिचर्डसन या माजी दिग्गज खेळाडूंनी विंडीज संघाशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत विंडीजचा संघ भारतीय संघाला किमान प्रतिकार करेल अशी अपेक्षा आहे. विंडीजच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार रॉस्टन चेस आणि शाय होप यांच्यावर, तर गोलंदाजीची भिस्त चेस, जोमेल वॉरिकन आणि खेरी पिएर यांच्यावर असेल. विंडीजकडे राखीव फळीतही अनुभवाची वानवा असल्याने या कसोटीसाठी संघात मोठे बदल होण्याची शक्यता कमीच आहे.
संघ
भारत : शुभमन गिल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, देवदत्त पडिक्कल, नारायण जगदीशन (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, प्रसिध कृष्णा.
वेस्ट इंडिज : रॉस्टन चेस (कर्णधार), केव्हलॉन अँडरसन, अलिक अथानाझे, जॉन कॅम्पबल, तेगनारायण चंद्रपॉल, शाय होप (यष्टिरक्षक), टेविन इम्लाच (यष्टिरक्षक), ब्रँडन किंग, जस्टिन ग्रेव्हज, जोहान लेन, खेरी पिएर, जोमेल वॉरिकन, जेडन सिल्स, अँडरसन फिलिप्स, जेदी ब्लेड्स.