देवेंद्र पांडे, इंडियन एक्सप्रेस
Rugby Based Fitness Test Cricket: भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर भारतीय संघ या मालिकेत बरोबरी साधण्यात यशस्वी ठरला. पण यादरम्यान भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, आकाशदीप यांना फिटनेसमुळे मालिकेदरम्यान अडथळा येत असल्याचं दिसून आलं. यानंतर आता टीम इंडियाच्या खेळाडूंचा फिटनेस चांगला राहावा यासाठी नवीन फिटनेस टेस्टला सुरूवात करण्यात आली आहे.
भारताच्या कोचिंग स्टाफमध्ये इंग्लंड दौऱ्यापूर्वी नवे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच एड्रियन ले रॉक्स यांची नियुक्ती करण्यात आली. ले रॉक्स यांनी भारतीय संघात पूर्वीचे कोच सोहम देसाई यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली. ले रॉक्स यांनी या नव्या फिटनेस टेस्टची माहिती दिली आहे.
भारतीय क्रिकेटपटूंनी उच्चस्तरीय फिटनेस राखावा आणि त्यांची एरोबिक क्षमता वाढावी यासाठी, रग्बीमधील ब्रॉन्को टेस्ट (२० मी., ४० मी. आणि ६० मी. अशी शटल रन) सुरू करण्यात आली आहे. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ही माहिती भारतीय संघाचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच एड्रियन ले रॉक्स यांनी दिली आहे. त्यांच्या मते, वेगवान गोलंदाजांनी जिममध्ये जास्त वेळ घालवण्यापेक्षा धावण्यावर भर द्यायला हवा. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील या मताशी सहमत आहेत.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेदरम्यान काही वेगवान गोलंदाजांचा फिटनेस अपेक्षेप्रमाणे नसल्याचं दिसून आलं. मोहम्मद सिराज हा एकमेव गोलंदाज मात्र प्रत्येक सामन्यात खेळला. काही मोठ्या खेळाडूंनी आधीच बंगळुरूतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ब्रॉन्को टेस्ट दिली आहे. क्रिकेटपटू यो-यो टेस्ट आणि २ किमी टाइम-ट्रायल अशा फिटनेस टेस्ट पूर्वीपासूनच देत आले आहेत.
काय आहे ब्रान्को टेस्ट? (What’s the Bronco Test?)
ब्रॉन्को टेस्टमध्ये खेळाडूला सुरुवातीला २० मीटर, त्यानंतर ४० मीटर आणि मग ६० मीटर असे शटल रन करावे लागतात, हा एक सेट असतो. असे पाच सेट्स म्हणजेच खेळाडूला न थांबता एकूण १२०० मीटर धावत ही टेस्ट द्यावी लागते. भारतीय खेळाडूंना ही ब्रॉन्को टेस्ट सहा मिनिटांत पूर्ण करण्याचं लक्ष्य देण्यात आलं आहे.
एड्रियन ले रॉक्स जून महिन्यात टीम इंडियाचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच म्हणून रुजू झाले. याआधी जानेवारी २००२ ते मे २००३ दरम्यान ते भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफचा भाग होते. याशिवाय त्यांनी दक्षिण आफ्रिका संघाबरोबर तसेच आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज संघांसोबतही काम केले आहे.
ब्रॉन्को टेस्ट का सुरू करण्यात आली आहे? (Why the Bronco Test?)
“ब्रॉन्को टेस्ट BCCIच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सुरू करण्यात आली आहे. भारतीय संघातील काही करारबद्ध खेळाडूंनी बंगळुरूला जाऊन ही टेस्ट दिली आहे. या टेस्टच्या माध्यमातून फिटनेस स्टँडर्स ठरवली जातील. विशेषत: भारतीय वेगवान गोलंदाज आवश्यत तितकं धावत नाहीत आणि जास्त वेळ जिममध्ये घालवतात, हे लक्षात आलं आहे. त्यामुळे आता खेळाडूंना फिटनेससाठी जास्त धावाणं गरजेचं असेल,” असं एका सूत्राने सांगितलं.
२ किमी टाइम ट्रायलसाठी ठरवलेले मापदंड
वेगवान गोलंदाज : ८ मिनिटं १५ सेकंद
फलंदाज, यष्टीरक्षक आणि फिरकीपटू : ८ मिनिटं ३० सेकंद
यो-यो टेस्ट (Yo-Yo Test)
या टेस्टमध्ये खेळाडूंना २० मीटर अंतरावर ठेवलेल्या मार्कर्सदरम्यान धावायचं असतं.
प्रत्येक ४० मीटर रननंतर १० सेकंदांची विश्रांती दिली जाते. वेग हळूहळू वाढवत हा धावण्याचा सराव असतो
भारतीय संघासाठी किमान यो-यो लेव्हल १७.१ निश्चित करण्यात आली आहे.