खलील, सकारियाकडून अपेक्षा; मार्शच्या कामगिरीकडेही लक्ष

पीटीआय, नवी दिल्ली

दिल्ली कॅपिटल्स मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत आपल्या घरच्या मैदानावर गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाविरुद्ध खेळेल. तेव्हा त्यांना आपल्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दुसरीकडे, सुरुवातीच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला पराभूत केल्यानंतर गुजरात टायटन्सचा आत्मविश्वास दुणावला असेल. दिल्लीला सत्राच्या सुरुवातीच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून ५० धावांनी पराभूत व्हावे लागले.

गोलंदाजांच्या कामगिरीकडे नजर

लखनऊविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक निराशा भारतीय गोलंदाजांनी केली होती आणि आनरिक नॉर्किएच्या अनुपस्थितीत गोलंदाजांना लखनऊविरुद्ध प्रभाव पाडता आला नव्हता. चेतन सकारिया आणि मुकेश कुमार चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. मात्र, पहिल्या सामन्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे शुभमन गिल व हार्दिक पंडय़ासारख्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. खलील अहमदने पहिल्या सामन्यात गोलंदाजीत चुणूक दाखवली. मात्र, क्षेत्ररक्षणात त्याने निराशा केली. त्याने लखनऊच्या मेयर्सचा झेल सोडला. त्याचा फटका संघाला बसला. नॉर्किए आणि लुंगी एन्गिडी या सामन्यानंतर उपलब्ध होणार असल्याने संघ व्यवस्थापनाचा अंतिम अकराची निवड करताना कस लागेल. फलंदाजीत डेव्हिड वॉर्नरला पृथ्वी शॉ आणि सर्फराज खानसारख्या भारतीय फलंदाजांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्शकडेही सर्वाचे लक्ष असेल. त्याने जलदगतीने धावा केल्यास संघाला त्याचा फायदा होईल.

गिल, पंडय़ा, रशीदवर संघाची मदार

पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध शुभमन गिलने आक्रमक खेळी केली होती. त्यामुळे या सामन्यातही आपली हीच लय कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असेल. वृद्धिमान साहा, हार्दिक पंडय़ा यांच्याकडून चांगल्या खेळीची संघाला अपेक्षा असणार आहे. केन विल्यम्सन स्पर्धेबाहेर गेल्याने संघाला त्याच्याजागी अंतिम अकरामध्ये योग्य खेळाडूची निवड करावी लागेल. गोलंदाजीत अनुभवी मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ व हार्दिकवर संघाची मदार असेल. रशीद खान संघाच्या फिरकीची धुरा सांभाळेल. संघाकडे पाहिल्यास दिल्लीविरुद्ध त्यांचे पारडे जड दिसत आहे.

’ वेळ : सायं. ७.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, ३, १ हिंदी, जिओ सिनेमा