India Record of 1000 plus Runs in Single Test Match: भारत वि. इंग्लंड एजबेस्टन कसोटीत भारताच्या सर्वच फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि भारताने डोंगराएवढ्या धावा करत ऐतिहासिक धावसंख्या नोंदवली. भारतीय संघाने पहिल्या डावात ५८७ धावा तर दुसऱ्या डावात ४२७ धावा केल्या. यामध्ये शुबमन गिलच्या धावांचा मोठा वाटा आहे.
भारताने इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा यांनी भारताच्या ऐतिहासिक धावसंख्येत मोठं योगदान दिलं आहे. गिलने एकट्याने या कसोटी सामन्यात ४३० धावा केल्या आहेत. यासह भारताने पहिल्यांदाच एका कसोटी सामन्यात एक हजाराहून अधिक धावा केल्यात.
भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये १०००+ धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कधीही टीम इंडियाने कसोटी सामन्यात एकूण १०००+ धावा केल्या नाहीत. आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये भारतीय संघाने एकूण १०१४ धावा केल्या आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने पहिल्या डावात द्विशतक झळकावले. त्याने एकापेक्षा एक कमालीचे फटके खेळत भारतीय कसोटी कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी केली. त्याने एकूण २६९ धावा केल्या. इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांची त्याने चांगलीच धुलाई केली. त्याच्याशिवाय यशस्वी जैस्वालने ८७ धावा आणि रवींद्र जडेजाने ८९ धावा केल्या. शेवटी, वॉशिंग्टन सुंदरनेही ४२ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या खेळाडूंमुळेच भारतीय संघ पहिल्या डावात ५८७ धावा करू शकला.
भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावातही आपली फटकेबाजी कायम ठेवली. शुबमन गिलने दुसऱ्या डावात १६१ धावा केल्या. यासह, तो एकाच कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावणारा दुसरा भारतीय ठरला. त्याच्याआधी हा विक्रम फक्त सुनील गावस्करांच्या नावे होता. केएल राहुलने ५५ धावा केल्या. त्याच्याशिवाय ऋषभ पंतने ६५ धावा केल्या. गिल आणि पंतने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. दुसऱ्या डावात रवींद्र जडेजानेही अर्धशतक करत ६९ धावांची खेळी केली. गिल आणि जडेजाने १७५ धावांची उत्कृष्ट भागीदारी रचत भारताच्या धावांमध्ये मोठी भर घातली.