भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दोन दिवस खेळून तब्बल ४८० धावांचा डोंगर उभा केला आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला तिसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा याच्या रूपात पहिला झटका बसला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने रोहितला बाद करण्यासाठी एक खास रणनीती तयार केली आणि त्यात तो यशस्वी झाला. भारताला मोठ्या भागीदारीची गरज आहे.

दुसऱ्या दिवसाच्या ३६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी आक्रमक सुरुवात करत शानदार फलंदाजी केली. मिचेल स्टार्क, लायन यांना त्यांनी चौकार आणि षटकार ठोकत धावगती वाढवण्यासाठी फटकेबाजी केली त्यात यशस्वी देखील होत होते. मात्र, त्याच दरम्यान स्मिथ रोहितला बाद करण्यासाठी वेगवेगळे क्षेत्ररक्षण लावत होता जेणेकरून फलंदाजांचे एकाग्रता भंग होईल आणि तसेच झाले.

भारताला पहिला धक्का ७४ धावांवर बसला. मॅथ्यू कुहनेमनने रोहितला आपल्या जाळ्यात अडकवले. तो चेंडू शॉर्ट आणि बाहेर पिच करत होता, रोहितने तो फटका थेट कव्हर पॉइंटवर खेळला आणि तो लाबुशेनकरवी झेलबाद झाला. त्याने ५८ चेंडूत ३५ धावा केल्या असून या खेळीत त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने एक गडी गमावून १२९ धावा केल्या आहेत. सध्या शुबमन गिल ११९ चेंडूत ६५ धावा करून नाबाद असून चेतेश्वर पुजारा ४६ चेंडूत २२ धावा करून नाबाद आहे. दोघांमध्ये आतापर्यंत ५५ धावांची भागीदारी झाली आहे.

पुजाराने केला नवीन विक्रम

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला तिसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा याच्या रूपात पहिला झटका बसला. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजारा याने खास विक्रमाची नोंद केली. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज बनला आहे. चेतेश्वर पुजाराने केलेल्या या धावांमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००० धावांचा टप्पा पार केला.

हेही वाचा: INDvsAUS 4th Test: चेतेश्वर पुजाराचा एक रिव्ह्यू अन् उस्मान ख्वाजाच्या पत्नीचे तुटले मन, पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी सचिन तेंडुलकर आहे. त्याने ३६३० धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त दुसऱ्या स्थानी व्हीव्हीएस लक्ष्मण असून त्याने २४३४ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त २१४३ धावांसह राहुल द्रविड तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. पुजाराकडे द्रविडच्या २१४३ धावांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. तसेच, भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली १७९३ धावांसह पाचव्या स्थानी आहे.