आज वानखेडे स्टेडियमवर अस्मितेचा संघर्ष शिगेला
‘‘मुंबईचा पाऊस.. जो दोन थेंब पडले की मुंबई बंद पडते तो..? पावसामुळे आमचे पुणे कधीच बंद पडत नाही. हो, पुणे फक्त लंच टाइममुळेच बंद होते,’’ हे ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ चित्रपटात नायकाने ठासून केलेले भाष्य. एकीकडे परिवर्तनाची लाट जरी या दोन शहरांमध्ये दिसून येत असली तरी अस्मितेचा प्रश्न निर्माण होताच पेटून उठत संघर्षांची भूमिका घेण्याची वृत्ती ही आजही तशीच टिकून आहे. ढगाळ वातावरणामुळे मुंबईकर एकीकडे हळुवारपणे छत्री, विनचीटर, आदी गोष्टींचा कानोसा घेऊ लागले असतानाच वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यातील ‘क्वालिफायर-१’ सामन्यातील धावांच्या पावसाकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबईने पुण्याकडून दोनदा हार पत्करली आहे, मात्र पुण्याला हरवून २१ मे रोजी हैदराबादला होणारी अंतिम फेरी थेट गाठण्याची नामी संधी मुंबई वाया घालवणार नाही, असा जाणकारांचा अंदाज आहे. अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईने कोलकाता नाइट रायडर्सला हरवून आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवत बाद फेरी गाठली. त्या सामन्यात मुंबईने आपली दुसरी फळीसुद्धा चाचपून पाहिली. त्यामुळे बाद फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यांसाठी मुंबईकडे बहुपर्याय उपलब्ध आहेत.
यंदाच्या हंगामात पुणे या एकमेव संघाने मुंबईला दोनदा हरवण्याचा पराक्रम दाखवला आहे, हेच मुंबईच्या संघाला पक्के लक्षात ठेवावे लागणार आहे. फलंदाजांची सांघिक ताकद, हे मुंबईचे वैशिष्टय़ आहे. लेंडल सिमन्स, किरॉन पोलार्ड, पार्थिव पटेल, कर्णधार रोहित शर्मा, नितीश राणा यांनी संघाची गरज लक्षात घेत वेळोवेळी जबाबदारीने फलंदाजी केली आहे. जगातील सर्वोत्तम प्रतिस्पर्धी गोलंदाजांची त्यांनी तमा बाळगली नसल्याचे सहज अधोरेखित होते. याशिवाय हार्दिक आणि कृणाल हे पंडय़ा बंधू आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर मुबईला सातत्याने कठीण परिस्थितीतून तारत आहेत.
फलंदाजीला अनुकूल वानखेडेच्या खेळपट्टीवर मंगळवारी क्रिकेटरसिकांचे मनोरंजन करणारा हा आणखी एक मोठय़ा धावसंख्येचा सामना होईल. पार्थिव आणि सिमन्स मुंबईच्या सलामीची धुरा वाहतील. मात्र तिसऱ्या स्थानासाठी दिल्लीचा नितीश राणा आणि मागील सामन्यातील सामनावीर अंबाती रायुडू यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकेल.
वानखेडेवरील मागील सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी किंग्ज ईलेव्हन पंजाबला २३० धावसंख्येपर्यंत मजल मारण्याची संधी दिली होती. पुण्याविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आणि न्यूझीलंडचा मिचेल मॅक्क्लिनॅघन मुंबईच्या वेगवान माऱ्याला प्रारंभ करतील. याशिवाय अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी करणारे जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पुण्याच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतील.
दुसरीकडे पंजाबवर दणदणीत विजय मिळवत दुसऱ्या स्थानावर झेप घेऊन आपले बाद फेरीतील स्थान निश्चित करणाऱ्या पुण्याचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. मात्र बाद फेरीत बेन स्टोक्सची उणीव आम्हाला तीव्रतेने भासेल, अशी प्रतिक्रिया कर्णधार स्टीव्हन स्मिथने सामन्यानंतर व्यक्त केली आहे. देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्टोक्स मायदेशी परतला आहे.
सलामीनीर राहुल त्रिपाठीने सातत्यपूर्ण फलंदाजी करीत एकंदर हंगामात ३३८ धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेकडून त्याला उत्तम साथ मिळण्याची अपेक्षा आहे.
[jwplayer mdNkwX3k]
जयदेव उनाडकट (२१ बळी), शार्दुल ठाकूर (८ बळी) आणि डॅनियल ख्रिस्तियन (९ बळी) हे गोलंदाज सातत्याने बळी घेत आपला प्रभाव पाडत आहेत. लेग-स्पिनर अँडम झम्पासुद्धा फिरकी जबाबदारी समर्थपणे पेलत आहे.
स्टीफन फ्लेमिंगच्या मार्गदर्शनाखालील पुण्याचा संघ कोणत्याही एका खेळाडूवर विसंबून नाही. सांघिक क्षमता आणि स्मिथच्या नेतृत्वाच्या बळावर पुण्याने इथपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील मुंबईविरुद्धचे वर्चस्व अबाधित राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
आजचा सामना
- मुंबई इंडियन्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स
- संघ
- मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लेंडल सिमन्स, मिचेल जॉन्सन, मिचेल मॅक्क्लिनॅघन, नितीश राणा, पार्थिव पटेल, सौरभ तिवारी, श्रेयस गोपाळ, टिम साऊदी, लसिथ मलिंगा, कृणाल पंडय़ा, किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू, असीला गुणरत्ने, हरभजन सिंग, हार्दिक पंडय़ा, जगदीश सुचित, जसप्रीत बुमराह, जोस बटलर, कर्ण शर्मा आणि विनय कुमार.
- रायझिंग पुणे सुपरजायंट्स : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, अजिंक्य रहाणे, मनोज तिवारी, डॅनियल ख्रिस्तियन, अॅडम झम्पा, शार्दुल ठाकूर, अंकुश बेन्स, लॉकी फग्र्युसन, जयदेव उनाडकट, उस्मान ख्वाजा, मिलिंद टंडन, सौरभ कुमार, ईश्वर पांडे, जसकरण सिंग, दीपक चहर, राहुल चहर, रजत भाटिया, बाबा अपराजित, मयांक अगरवाल, अंकित शर्मा, अशोक दिंडा.
- सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
- थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्स, सोनी सिक्स आणि सोनी ईएसपीएन.
