IPL 2019 या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आणि या स्पर्धेचे साऱ्यांना वेध लागले. २३ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेच्या पहिल्या २ आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा रंगणार आहे. माजी कर्णधार विरुद्ध सध्याचा कर्णधार असा सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
तसेच आजी-माजी कर्णधारांमधील लढतींबरोबरच दुसऱ्या दिवशी या स्पर्धेत भारताच्या दोन सलामीवीरांमधील सामना रंगणार आहे. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ विरुद्ध शिखर धवनचा दिल्ली कपिटल्स संघ या स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात आमनेसामने येणार आहेत. २४ मार्चला हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. अशा ‘हाय व्होल्टेज’ सामन्यांनी स्पर्धेची सुरुवात होणार असल्यामुळे सर्वच जण यंदाच्या स्पर्धेकडे डोळे लावून बसले आहेत. या दरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने या स्पर्धेतील टॉप ४ संघ कोणते असतील याबाबत भविष्यवाणी केली आहे.
IPL 2019 मध्ये मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे चार संघ प्ले ऑफ्स चे सामने खेळतील. या स्पर्धेत एकूण ८ संघ असतात. त्या संघांमध्ये साखळी सामने होतात आणि त्यातून सर्वोत्तम खेळ करणाऱ्या ४ संघाना पुढील फेरीसाठी पात्र ठरण्याचा मान मिळतो. हेच ४ संघ ‘प्ले ऑफ्स’ म्हणजेच बाद फेरीत खेळतात. त्यातदेखील पहिल्या सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा संघ एकमेकांविरोधात लढतो. त्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरी गाठतो, तर पराभूत संघ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघात होणाऱ्या विजेत्या संघाशी २ हात करतो. हे ४ संघ म्हणजे मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे असतील, असे मत गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.
गंभीरच्या आधी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन आणि मिचेल जॉन्सन यांनीदेखील ‘प्ले-ऑफ्स’ मधील संघांबाबत वक्तव्य केले होते. हेडनने चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि हैदराबाद या चार संघाना या यादीत स्थान दिले होते. जॉन्सनचे मात्र याबाबतचे मत भिन्न होते. जॉन्सनच्या मते चेन्नई, मुंबई हे दोन संघ ‘प्ले-ऑफ्स’ मध्ये असतीलच. पण त्या बरोबर बंगळुरू आणि राजस्थान हे दोन संघदेखील या फेरीत पोहोचतील, असे जॉन्सनने म्हटले होते.