इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : बाद फेरी गाठण्याचे कोलकाता-पंजाबपुढे आव्हान

मोहाली : फक्त एका पराभवामुळे दोन वेळा विजेते कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज ईलेव्हन पंजाबचे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील आव्हान संपुष्टात येऊ शकते. शुक्रवारी बाद फेरीच्या निर्धारासह हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत.

‘आयपीएल’च्या गुणतालिकेत कोलकाता आणि पंजाब या दोन्ही संघांच्या खात्यांवर १२ सामन्यांद्वारे १० गुण जमा आहेत. मात्र सरस धावगतीच्या बळावर ते अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. त्यामुळे यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात पूर्वार्धात दमदार मुसंडी मारणाऱ्या मात्र उत्तरार्धात पकड ढिली झालेल्या या दोन संघांना बाद फेरी गाठण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. पहिल्या पाच सामन्यांपैकी कोलकाताने चार सामने जिंकले, तर एक गमावला. परंतु त्यानंतर सलग सहा सामन्यांत पराभव पत्करल्यामुळे त्यांच्या कामगिरीतील सातत्य हरवले होते. मात्र मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात कोलकाता पुन्हा विजयपथावर परतले आहेत.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने २ बाद २३२ धावांचा डोंगर उभारला होता. यात शुभमन गिल (७५), ख्रिस लिन (५४) आणि आंद्रे रसेल (नाबाद ८०) यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यानंतर गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावल्यामुळे कोलकाताला ३४ धावांनी विजय साकारता आला. रसेलने आपल्या दिमाखदार फलंदाजीने यंदाच्या ‘आयपीएल’वर छाप पाडली आहे. त्याने १२ सामन्यांत २०७.६९च्या स्ट्राइक रेटने ४८६ धावा केल्या आहेत.

फलंदाजी हे कोलकाताचे बलस्थान असले तरी गोलंदाजीत त्यांचे कच्चे दुवे समोर येतात. अनुभवी गोलंदाज सुनील नरिन, पियूष चावला हे मुंबईविरुद्धच्या सामन्यात महागडे ठरले होते. रसेलने गोलंदाजीतही प्रभाव पाडताना २५ धावांत २ बळी घेतले.

कोलकाताप्रमाणेच पंजाबलाही सलग तीन पराभवांची मालिका खंडित करायची आहे. उणे धावगती खात्यावर असणे पंजाबसाठी धोकादायक ठरू शकते. लोकेश राहुल (१२ सामन्यांत ५२० धावा) यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, तर ख्रिस गेल (४४८ धावा) पाचव्या स्थानावर आहे. मात्र तरीही गेलच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव दिसून आलेला आहे. मधल्या फळीतील फलंदाज मयांग अगरवाल, निकोलस पूरण आणि डेव्हिड मिलर यांनी अधिक जबाबदारीने खेळण्याची गरज आहे. पंजाबची गोलंदाजी प्रामुख्याने कर्णधार रविचंद्रन अश्विन आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर अलवंबून आहे.

संघ

कोलकाता नाईट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार व यष्टिरक्षक), रॉबिन उथप्पा, ख्रिस लीन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, सुनील नरिन, पीयूष चावला, कुलदीप यादव, निखिल नाईक, जोए डेन्ली, श्रीकांत मुंढे, नितीश राणा, संदीप वॉरियर, प्रसिध कृष्णा, लॉकी फग्र्युसन, हॅरी गुर्नी,यारा पृथ्वीराज, के. सी. करिअप्पा,  मॅट केली.

किंग्ज इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, मयांक अगरवाल, सर्फराझ खान, सर्फराज खान, डेव्हिड मिलर, मनदीप सिंग, सॅम करन, अँड्रय़ू टाय, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, मोझेस हेन्रिक्स, वरुण चक्रवर्ती, हरप्रीत ब्रार, सिमरन सिंग, निकोलस पूरण, हार्डस व्हिलजोएन, अंकित राजपूत, अर्शदीप सिंग, दर्शन नळकांडे, अग्निवेश अयाची.

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १