IPL 2019 : जिद्दीला सलाम! वडील ICU मध्ये असतानाही पार्थिव मैदानावर

पार्थिवचे वडील दोन महिन्यापासून ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आहेत

IPL 2019 KXIP vs RCB : कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अखेर बंगळुरूच्या संघाने यंदाच्या हंगामातील पहिलावहिला विजय मिळवला. १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने पंजाबला ८ गडी आणि ४ चेंडू राखून पराभूत केले. या विजयाबरोबर बंगळुरूने अखेर IPL २०१९ च्या गुणतालिकेत आपले खाते उघडले. मात्र एक खेळाडू हा पहिल्या सामान्यांपासून बंगळुरूसाठी चांगली खेळी करताना दिसत आहे. तो खेळाडू म्हणजे पार्थिव पटेल.

यंदाच्या हंगामात पहिल्याच सामन्यात बंगळुरूवर ७० धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढवली. या सामन्यात पूर्ण संघ बाद होत असताना पार्थिव एकटा मैदानावर लढत होता. त्यानंतरदेखील बंगळुरूच्या सामन्यात पार्थिवने चांगली कामगिरी केली. स्वतःचे वडील ICU मध्ये असताना मैदानावर खेळत रहाणे आणि चांगली कामगिरी करणे यासाठी एक जिद्द लागते. पार्थिव पटेल त्याच जिद्दीने मैदानावर चांगली कामगिरी करत आहे आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा वडिलांना भेटायला जातो आहे.

पार्थिवच्या वडीलांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात अहमदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पार्थिवला संघासोबत अनेक शहरांत प्रवास करावा लागत आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना पार्थिव म्हणाला, ”माझे लक्ष सतत फोनकडे असते. घरातून फोन आल्यावर भीतीच वाटते. त्यामुळे मॅच संपल्यावर पार्थिव लगेच वडिलांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो. संघाने मला तशी परवानगी दिली आहे. मैदानावर असताना माझ्या डोक्यात दुसरा कोणताच विचार नसतो. परंतु, मॅच संपताच मला घराची ओढ लागते. सकाळी उठल्यावर वडीलांच्या तब्येतीची चौकशी मी करतो. डॉक्टरांशीही चर्चा करतो.”

”माझ्या वडिलांची प्रकृती पाहता काही महत्त्वाचे निर्णय घ्यायची अनेकदा वेळ येते. माझी आई आणि पत्नी घरी असतात, परंतु अखेरचा निर्णय त्या दोघी मला विचारूनच घेतात. फक्त मॅच असताना एखादी वेळ आली, तर तो निर्णय कुटुंबीय घेतात. त्याबाबत मला नंतर कळवले जाते. यामागचे एकमेव कारण म्हणजे माझे लक्ष विचलित होऊ नये हाच असते. कारण ते माझीहि तेवढीच काळजी करतात.” असे तो म्हणाला.

दरम्यान, पंजाबविरुद्धच्या शनिवारी झालेल्या सामन्यात १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेलने ४ चौकार लगावत दणकेबाज सुरुवात केली होती. पण मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. त्याने ९ चेंडूत १९ धावा केल्या. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने चौकार षटकारांची आतषबाजी करत दमदार अर्धशतक केले. अर्धशतक केल्यानंतर फटकेबाजी करताना विराट कोहली झेलबाद झाला आणि बंगळुरूला दुसरा धक्का बसला. त्याने ८ चौकारांसह ५३ चेंडूत ६७ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर एबी डीव्हिलियर्स आणि मार्कस स्टॉयनीस या दोघांनी डाव सावरला आणि संघाला हंगामातील पहिला विजय मिळवून दिला. डीव्हिलियर्सने ३८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार ठोकत नाबाद ५९ धावा केल्या. तर स्टॉयनीसने १६ चेंडूत ४ चौकार लगावत नाबाद २८ धावा केल्या.

त्याआधी सलामीवीर ख्रिस गेलच्या आक्रमक खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने घरच्या मैदानावर खेळत असताना 173 धावांपर्यंत मजल मारली. लोकेश राहुल आणि ख्रिस गेल जोडीने पंजाबच्या डावाची अतिशय आक्रमक सुरुवात करुन दिली होती. मात्र लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत आपल्या विकेट फेकल्या. यामुळे मधल्या षटकांमध्ये पंजाबची धावगती मंदावली. मात्र ख्रिस गेलने अखेरच्या षटकांमध्ये आपला दाणपट्टा चालवत संघाला 173 धावांचा पल्ला गाठून दिला. ख्रिस गेलने 64 चेंडूत 99 धावांची खेळी केली

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी पहिल्या षटकापासून बंगळुरुवर हल्ला चढवला. विशेषकरुन ख्रिस गेलने सर्वा गोलंदाजांची धुलाई केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत गेलने झटपट धावा जमवल्या. मात्र लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर मयांक अग्रवाल, सरफराज खान आणि सॅम करन झटपट बाद झाले. यावेळी गेलने स्वतःवर संयम ठेवत एक बाजू लावून धरली. दुसऱ्या बाजूने मनदीप सिंहने त्याला चांगली साथ दिली. अखेरच्या षटकांत केलेल्या याच फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने 2, तर मोहम्मद सिराज आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 2019 kxip vs rcb parthiv patel showing 100 percent commitment on field even after his father is in icu