IPL 2019 MI vs KKR : मुंबई इंडियन्स संघाने कोलकाताच्या संघावर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कोलकाताने दिलेले १३४ धावांचे आव्हान कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर मुंबईने सहज पूर्ण केले. या विजयासह मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाली. पराभवामुळे कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर हैदराबादला प्ले-ऑफ्स फेरीत स्थान मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात पहिल्या षटकापासून मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या धावगतीवर अंकुश ठेवला. कोलकाताकडून ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पाचा अपवाद वगळता एकही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. शुभमन गिल (९) आणि ख्रिस लिन (४१) जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र हार्दिक पांड्याने गिलला माघारी धाडत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ठराविक अंतराने ख्रिस लिनही माघारी परतला. रॉबिन उथप्पाने संघर्षपूर्ण ४० धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांची त्याला साथ लाभू शकली नाही. ठराविक अंतराने फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे कोलकाताचा संघ मोठी भागीदारी रचू शकला नाही. मुंबईकडून लसिथ मलिंगाने ३ फलंदाजांना माघारी धाडलं. त्याला हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहने २-२ बळी घेत चांगली साथ दिली.

या डावात कृणाल पांड्याने एक अतिशय असामान्य अशी कामगिरी करून दाखवली. त्याने ४ षटकात केवळ १४ धावा दिल्या. विशेष म्हणजे त्याने गोलंदाजी करताना फलंदाजाला एकही दुहेरी धाव किंवा चौकार – षटकार लगावू दिले नाहीत. त्याने २४ पैकी १० निर्धाव चेंडू टाकले आणि ४ षटकात ३.५० च्या सरासरीने टिच्चून मारा केला.

या १३४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर डी कॉक याने चांगली सुरुवात केली, पण मोठा फटका खेळताना तो माघारी परतला. त्याने ३० धावा केल्या. पण रोहित शर्मा पाय रोवून मैदानावर उभा राहिला आणि सामन्यात अर्धशतक केले. रोहितने ८ चौकारांसह ५५ धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने रोहितला उत्तम साथ दिली. त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावत नाबाद ४६ धावा केल्या.

आता प्ले ऑफ्स मध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. तर दुसरा सामना दिल्ली विरुद्ध हैदराबाद असा असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 mi vs kkr krunal pandya become only bowler in the match who did not concede double four or six
First published on: 06-05-2019 at 18:30 IST