आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नई आणि बंगळुरु यांच्यात रंगलेल्या सामन्यात धोनी ब्रिगेडनं बाजी मारली. विराटसेनेचा विजयरथ अखेर चेन्नईच्या धोनी ब्रिगेडनं वानखेडे मैदानावर रोखला. चेन्नईनं हा सामना ६९ धावांनी जिंकला. जडेजाच्या वादळी फलंदाजीमुळे चेन्नईनं बंगळुरुला विजयासाठी १९२ धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र बंगळुरुचा संघ ९ गडी गमवून १२२ धावांपर्यंत मजल मारु शकला. चेन्नईन या विजयासह आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.

चेन्नईनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय आघाडीला आलेल्या ऋतुराज गायकवाड आणि फाफनं खरा करून दाखवला. आश्वासक फलंदाजी करत या दोघांनी ७४ धावांची भागिदारी केली. तर फाफनं ४१ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे चेन्नई मजबूत स्थितीत होती. मात्र रैना आणि फाफ हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर झटपट बाद झाल्याने धावसंख्या मंदावली होती. त्यानंतर मैदानात असलेलं रविंद्र जडेजा नावाचं वादळ घोंगावलं आणि बंगळुरुची दाणादाण उडाली. जडेजाने शेवटच्या षटकात चेन्नईच्या हर्षल पटेलची चांगलीच धुलाई केली. त्या षटकात एकूण ३७ धावा आल्या. या षटकात जडेजानं ५ षटकार आणि एक चौकार ठोकला. त्याच्या फलंदाजीपुढे पर्पल कॅपचा मानकरी असलेला हर्षल पटेल पुरता हतबल दिसला. या सामन्यात जडेजाने २८ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. या खेळीत ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. फलंदाजीसोबत रविंद्र जडेजाने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही कमाल दाखवली. त्याने ४ षटकात १३ धावा देत ३ गडी बाद केले. त्यात त्याने एक षटक निर्धाव टाकलं. तसेच क्षेत्ररक्षणात आपली कसब दाखवत डॅन ख्रिश्चनला धावचीत केलं. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

IPL २०२१ : म्हणूनच ‘सर’ रवींद्र जडेजा..एका षटकात कुटल्या ३७ धावा!

चेन्नईकडून रविंद्र जडेजाने ३ गडी, इम्रान ताहिरनं २ गडी, तर सॅम करन आणि शार्दुल ठाकुरनं प्रत्येकी एक गडी बाद केला.इम्रान ताहीरनं ४ षटकात १६ धावा, शार्दुल ठाकुरनं ४ षटकात ११ धावा, सॅम करननं ४ षटकात ३५ धावा, दीपक चहरनं २ षटकात २५ धावा, तर ड्वेन ब्रावोनं २ षटकात १९ धावा दिल्या.

‘‘माझे शब्द लक्षात ठेवा…IPLच्या शेवटी शुबमन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेन्नईनं विजयासाठी दिलेल्या धावा करताना बंगळुरुचा एकही फलंदाज तग धरु शकला नाही. संघाची धावसंख्या ४४ असताना कर्णधार विराट कोहली बाद झाला. त्यानंतर एक एक करत ९ खेळाडू तंबूत येत गेले. विराट ८ धावा, देवदत्त पडिक्कल ३४ धावा, वॉशिंग्टन सुंदर ७ धावा, ग्लेन मॅक्सवेल २२ धावा, एबी डिव्हिलियर्स ४ धावा, डॅन ख्रिश्चन १ धाव, जेमिसन १६ धावा, हर्षल पटेल ०, नवदीप सैनी २ धावा करुन तंबूत परतले. त्यामुळे हा सामना जिंकून विजयी पंच मारण्याचं विराटचं स्वप्न भंगलं आहे. आता बंगळुरुचा पुढचा सामना दिल्लीसोबत २७ एप्रिलला होणार आहे.