IPL Auction 2026 Date Revealed: आयपीएल २०२६साठीच्या लिलावाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएल २०२६ मध्ये संघांमध्ये कोणते मोठे बदल दिसणार, कोणत्या नव्या खेळाडूंना संधी मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. यादरम्यान आता क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार आयपीएल लिलावाची तारीख समोर आली आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या रिटेंशनची डेडलाईनदेखील समोर आली आहे.

क्रिकबझच्या एका वृत्तानुसार, आयपीएल २०२६ चा लिलाव या वर्षी डिसेंबरमध्ये होईल. डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लिलाव होण्याची शक्यता आहे, म्हणजेच १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. तर रिटेन खेळाडूंची लिस्ट देण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर असेल.

आयपीएल २०२६चा लिलाव मागील दोन हंगामांप्रमाणे भारतात होईल की परदेशात याबद्दल सध्या कोणतीही माहिती क्रिकबझने दिलेली नाही. आयपीएल २०२३ चा लिलाव दुबईमध्ये झाला होता, तर आयपीएल २०२४ चा लिलाव जेद्दाहमध्ये झाला. फ्रँचायझीच्या जवळच्या सूत्रांचा हवाला देत या वृत्तात म्हटलं आहे की, मिनी लिलाव असल्याने भारतातही होऊ शकतो.

आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावापूर्वी खेळाडू कायम ठेवण्यासाठी फ्रँचायझींसाठी १५ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. सर्व फ्रँचायझींनी त्या तारखेपर्यंत २०२६ च्या हंगामासाठी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं सादर करायची आहेत. रिपोर्ट्सनुसार, चेन्नई आणि राजस्थान फ्रँचायझी वगळता, इतर फ्रँचायझी संघातील मोठी नावं असलेले खेळाडू रिलीज करणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स संघात IPL 2026साठी मोठे बदल होणार

वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्जकडून रिलीज होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दीपक हुडा, विजय शंकर, राहुल त्रिपाठी, सॅम करन आणि डेव्हॉन कॉन्वे यांचा समावेश आहे. शिवाय, अश्विनच्या निवृत्तीमुळे संघाच्या पर्समध्ये मोठी रक्कम आहे. तर, राजस्थान रॉयल्स वानिंदु हसरंगा आणि महेश तीक्ष्णा सारख्या फिरकीपटूंना रिलीज करू शकते. संजू सॅमसन देखील पुढील हंगामासाठी राजस्थान संघाचा भाग नसणार असल्याचं म्हटलं जात आहे.