Akash Madhwal breaks Doug Ballinger’s record: आयपीएल २०२३ मध्ये मुंबई विरुद्ध लखनऊ संघात २४ मे रोजी एलिमिनेटर सामना खेळला गेला, ज्यामध्ये पाच वेळा विजेते मुंबई इंडियन्सने त्यांच्या दमदार कामगिरीमुळे लखनऊ सुपर जायंट्सचा एकतर्फी पराभव करण्यात यश मिळवले. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर फिरकीपटूंचे वर्चस्व होते, परंतु मुंबई इंडियन्ससाठी वेगवान गोलंदाज आकाश मधवालने शानदार गोलंदाजी केली. तो आपल्या संघाच्या विजयाचा हिरो ठरला. त्‍याच्‍या शानदार गोलंदाजीमुळे त्‍याला ‘मॅच ऑफ द मॅच’चा किताबही देण्यात आला. त्याचबरोबर त्याने १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

आकाश मधवालने आपल्या धारदार गोलंदाजीने लखनऊच्या फलंदाजांना टिकून राहण्याची संधी दिली नाही. त्यामुळे लखनऊ संघाचे फलंदाज पूर्ण षटकेही खेळू शकले नाहीत. परिणामी, मुंबई इंडियन्सने एकतर्फी विजय मिळवून क्वालिफायर दोन मध्ये प्रवेश केला. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी त्यांचा सामना गुजरात टायटन्सशी होईल.

आकाश मधवालने आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदवली –

लखनऊविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये, उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने ३.३ षटकात ५ धावा देऊन ५ बळी घेतले. त्याचबरोबर आकाशने आयपीएल प्लेऑफमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रमही त्याच्या नावावर केला आहे. मधवालच्या आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डग बॉलिंगरच्या नावावर होता, ज्याने २०१० मध्ये मुंबईत झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसाठी डेक्कन चार्जर्सविरुद्ध १३ धावांत ४ बळी घेतले होते.

हेही वाचा – LSG vs MI: मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर लखनऊचे खेळाडू एकमेकांना धडकल्याचा VIDEO व्हायरल; चाहते म्हणाले, ‘गंभीर…’

यानंतर धवल कुलकर्णी आणि जसप्रीत बुमराहचे नाव येते. या दोघांच्या गोलंदाजीचे आकडे सारखेच आहेतध्ये. २०१६ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबी विरुद्ध गुजरात लायन्सकडून खेळताना धवलने चार षटकात १४ धावा देत ४ बळी घेतले होते. दुसरीकडे, बुमराहने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल २०२० च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये ४/१४ अशी नोंद केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मैदानाबाहेरही अनिल कुंबळेशी साम्य –

आकाश मधवाल मूळचा रुरकी, उत्तराखंडचा असून तो स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतचा शेजारी आहे. आकाश आणि कुंबळे यांच्यात एक समानता आहे की, दोघेही इंजिनिअर आहेत. २०१८ च्या आधी आकाश टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचा. वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत त्याने कसोटी क्रिकेटच्या चेंडूला स्पर्शही केला नव्हता. मात्र ५ वर्षांनंतरची कथा पूर्णपणे वेगळी आहे. आता तो मुंबई इंडियन्समध्ये जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूंमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढताना दिसत आहे.