IPL 2025, Punjab Kings: पंजाब किंग्जने आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी संघात मोठे बदल केले होते. संघाचा कर्णधार बदलला, श्रेयस अय्यरवर मोठी बोली लावून त्याला संघात घेतलं. त्यानंतर रिकी पाँटिंगकडे मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली. त्यामुळे पंजाबने या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. आता प्लेऑफ्स जवळ असताना पंजाब किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आयपीएल २०२५ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्जला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र, शेवटचे काही सामने शिल्लक असताना संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो स्पर्धेतील उर्वरित सामने खेळू शकणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तो या हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजीतही फ्लॉप ठरला आहे. मात्र, तरीदेखील मॅक्सवेलसारखा खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडणं हा पंजाबसाठी मोठा धक्का आहे.

ग्लेन मॅक्सवेल स्पर्धेतून बाहेर पडत असल्याची माहिती पंजाब किंग्जच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंवरून पोस्ट शेअर करत लिहिले की, “ ग्लेन मॅक्सवेल बोटाच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतील उर्वरित सामने खेळू शकणार नाही. आम्ही प्रार्थना करतो, तो लवकरात लवकर ठीक होईल. ” यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यरने याबाबत माहिती दिली होती. मात्र आता पंजाब किंग्जने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

पंजाब किंग्जने ग्लेन मॅक्सवेलच्या जागी कोण खेळणार, याबाबत कुठलीही घोषणा केली नाही. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात पंजाब किंग्जने त्याला ४ कोटी २० लाखांची किंमत मोजून आपल्या संघात स्थान दिलं होतं. मात्र त्याला नावाला साजेशी अशी कामगिरी करता आलेली नाही. ७ सामन्यातील ६ डावात त्याला अवघ्या ४८ धावा करता आल्या आहेत. तर गोलंदाजीत त्याने ४ गडी बाद केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्लेन मॅक्सवेल आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पंजाब किंग्जने त्याला फिनिशर म्हणून आपल्या संघात स्थान दिलं होतं. मात्र, तो एकाही सामन्यात संघासाठी सामना फिनिश करू शकलेला नाही.याशिवाय गोलंदाजीतही तो विकेट्स काढून देऊ शकलेला नाही. त्यामुळे पंजाब किंग्ज आता त्याच्या जागी कोणाला संधी देणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.