MS Dhoni Highest Taxpayer in Jharkhand: माजी कर्णधार एमएस धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीनंतरही चाहत्यांचे धोनीवरील प्रेम कमी झालेले नाही. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा धोनी सध्या आयपीएल २०२३ मध्ये धुमाकूळ घालत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेकदा खेळाडूंच्या कमाईत घट होत असते, मात्र धोनीबाबत असे घडलेले नाही. त्याच्या कमाईत सातत्याने वाढ होत आहे. धोनीने २०२२-२३ या आर्थिक वर्षात झारखंडमध्ये सर्वाधिक कर भरला आहे.
धोनी झारखंडमध्ये ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती –
आयकर विभागाच्या माहितीनुसार, महेंद्रसिंग धोनीने २०२२-२३ या आर्थिक वर्षात झारखंडमध्ये सर्वाधिक कर भरला आहे. त्यानी या आर्थिक वर्षात ३८ कोटी रुपयांचा आगाऊ कर भरला आहे. धोनी झारखंडमध्ये पहिल्यांदाच सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती ठरला आहे. यापूर्वी, धोनीने २०२१-२२ या आर्थिक वर्षातही तेवढाच आगाऊ कर भरला होता.
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेंद्रसिंग धोनीची यावर्षीची संपत्ती १०३० कोटी रुपये आहे. त्याच्या वार्षिक कमाईबद्दल बोलताना, रिपोर्ट्सनुसार धोनी एका वर्षात सुमारे ४ कोटी रुपये कमावतो. असे फार कमी क्रिकेटर्स आहेत, ज्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कमाई वाढल्याली दिसते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्तीनंतर धोनीच्या कमाईत वाढ –
निवृत्तीनंतर धोनीच्या कमाईत सातत्याने वाढ होत आहे. वृत्तानुसार, धोनीने २०२०-२१ या आर्थिक वर्षात आगाऊ कर म्हणून ३० कोटी रुपये जमा केले होते. तज्ज्ञांच्या मते, त्यानुसार पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१-२२ या आर्थिक वर्षात धोनीच्या कमाईत सुमारे १३० कोटींची वाढ झाली आहे.
वृत्तानुसार, धोनीने २०१९-२० मध्ये २८ कोटी रुपयांचा आगाऊ कर जमा केला होता, जो २०१८-१९ प्रमाणेच होता. तर २०१७-१८ या आर्थिक वर्षात धोनीने १२.१७ कोटी रुपये आणि २०१६०१७ मध्ये १०.९३ कोटी रुपये आगाऊ कर जमा केले होते.
एमएस धोनीचा टप्पा पार करणारा सातवा खेळाडू –
धोनीने आयपीएलमध्ये २३६ सामन्यांमध्ये ३९.०९ च्या सरासरीने आणि १३५.५४ च्या स्ट्राइक रेटने ५००४ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात ५००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा धोनी हा सातवा फलंदाज आहे. त्याच्याआधी विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि एबी डिव्हिलियर्स यांनी ही कामगिरी केली आहे. कोहली या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने २२४ सामन्यात ६७०६ धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ शिखर धवनचा क्रमांक लागतो, ज्याने २०७ सामन्यात ६२८३ धावा केल्या आहेत.
