हंगामातल्या पहिल्यावहिल्या सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने घरच्या मैदानावर राजस्थानवर विजय मिळवला. अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मिचेल स्टार्कने सुपर ओव्हरमध्ये राजस्थानच्या फलंदाजांना अकरा धावाच करू दिल्या. राहुल आणि ट्रिस्टन स्टब्ज यांनी दिल्लीला शानदार विजय मिळवून दिला.

१२ धावांचा पाठलाग करताना राहुलने पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्या. थ्रो अचूक असता तर राहुल रनआऊट झाला असता. दुसऱ्या चेंडूवर राहुलने चौकार खेचला. तिसऱ्या चेंडूवर राहुलने एक धाव मिळवली. चौथ्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्जने षटकार खेचत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

मिचेल स्टार्कने टाकलेल्या षटकात शिमोरन हेटमायरला धाव काढता आली नाही. दुसऱ्या चेंडूवर त्याने चौकार लगावला. तिसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव काढली. चौथ्या चेंडूवर ध्रुव जुरेलने चौकार लगावला. पंचांनी नोबॉलचा कौल दिला. अशा रीतीने एका चेंडूवर पाच धावा निघाल्या. पुढच्या चेंडूवर रियान पराग रनआऊट झाला. पाचव्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात यशस्वी जैस्वाल रनआऊट झाला आणि राजस्थानचा डाव आटोपला. राजस्थानने ११ धावा केल्या.

आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांनी ३४ चेंडूत ६१ धावांची खणखणीत सलामी दिली. विपराज निगमच्या षटकात चौकार, षटकार खेचल्यानंतर संजूला दुखापतीचा त्रास जाणवला. एक चेंडू खेळून संजू रिटायर हर्ट झाला. रियान परागला अक्षर पटेलने त्रिफळाचीत केलं. ३७ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५१ धावांची खेळी करून यशस्वी जैस्वाल बाद झाला. यशस्वी बाद झाल्यानंतर नितीश राणाने सामन्याची सूत्रं हाती घेतली. सातत्याने चौकार, षटकारांची लूट करत नितीनने धावगतीचं आव्हान नियंत्रणात ठेवलं. नितीशला बाद करत स्टार्कने राजस्थानला धक्का दिला. मोहित शर्माने टाकलेल्या १९व्या षटकात राजस्थानने १४ धावा काढल्या. शेवटच्या षटकात राजस्थानला ९ धावांची आवश्यकता होती. मात्र मिचेल स्टार्कच्या घोटीव गोलंदाजीसमोर शिमोरन हेटमायर आणि ध्रुव जुरेल जोडीला चौकार किंवा षटकार मारता आला नाही. शेवटच्या चेंडूवर राजस्थानला दोन धावांची आवश्यकता होती. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात ध्रुव जुरेल रनआऊट झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये जाणार हे स्पष्ट झालं.

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जेक फ्रेझर मॅकगर्क या लढतीतही आततायी फटका खेळून बाद झाला. त्याच्या जागी करुण नायर फलंदाजीला आला. मुंबई इंडियन्सविरुद्ध करुणने झंझावाती खेळी केली होती. सात वर्षानंतर करुणने आयपीएल स्पर्धेत अर्धशतक पूर्ण केलं. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात करुण भोपळाही न फोडता बाद झाला. यानंतर अभिषेक पोरेल आणि के.एल.राहुल यांनी डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. जोफ्रा आर्चरने राहुलला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३२ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. थोड्याच वेळात अभिषेक पोरेलही तंबूत परतला. वानिंदू हासारंगाने त्याला बाद केलं. त्याचं अर्धशतक एका धावेने हुकलं. कर्णधार अक्षर पटेल याने ट्रिस्टन स्टब्जला साथीला घेत पाचव्या विकेटसाठी १९ चेंडूत ४१ धावांची भागीदारी केली. अक्षर … करुन बाद झाला. यानंतर स्टब्जला आशुतोष शर्माची साथ मिळाली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी १९ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केली. या दोन भागीदाऱ्यांच्या बळावर दिल्लीने राजस्थानसमोर १८९ धावांचं लक्ष्य ठेवलं.