IPL 2025 Dewald Brewis Catch Video Viral: आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर केलं आहे. पण चेन्नईच्या संघाने पंजाबविरूद्ध अखेरच्या चेंडूपर्यंत कडवी झुंज दिली. यादरम्यान संघाचा नवा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसने सीमारेषेजवळ एक थक्क करणारा झेल टिपला.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने १९१ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्जने जलदगतीने लक्ष्याचा पाठलाग केला आणि १९३धावा करत हे लक्ष्य सहज गाठले. पण, या वेळी बेबी एबी डेवाल्ड ब्रेविसने एक आश्चर्यकारक झेल घेतला.
पंजाब सीएसके सामन्यात पहिल्या डावात युजवेंद्र चहलच्या हॅटट्रिकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर पंजाब किंग्जच्या डावाच्या शेवटी डेवाल्ड ब्रेव्हिसने घेतलेला झेलही अद्भुत होता, ज्याने सर्वांनाच थक्क केले. पंजाबच्या डावाच्या १८ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हा आश्चर्यकारक झेल टिपला आणि शशांक सिंग रवींद्र जडेजाच्या चेंडूवर बाद झाला.
जडेजाच्या षटकातील चेंडूवर शशांक सिंग बॅकफूटवर गेला आणि त्याने डीप मिड-विकेटकडे त्याचा शॉट खेळला. त्याचा चेंडू सीमा ओलांडण्याच्या बेतात होता, पण डेवाल्ड ब्रेव्हिस मध्ये आला. ब्रेव्हिसने चेंडूवर नजर ठेवून शरीराचं नीट संतुलन राखत एक थक्क करणारा झेल यशस्वीरित्या टिपला. ब्रेविसने सीमारेषेच्या आतबाहेर जात ३ प्रयत्नांनंतर हा झेल टिपला. प्रेक्षक, खेळाडू, कमेंटेटर्स सर्वच जण त्याचा हा झेल पाहून चकित झाले. सोशल मीडियावर सध्या डेवाल्ड ब्रेविसच्या अनोख्या झेलची चर्चा सुरू आहे आणि व्हीडिओ व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात पाहुण्या संघाने विजय मिळवला आहे. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद होत १९० धावा केल्या प्रत्युत्तरात, पंजाब किंग्जने प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यरच्या खेळीच्या जोरावर लक्ष्य गाठले आणि ४ विकेट्स राखून विजय मिळवला.
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने घरच्या मैदानावर म्हणजेच अभेद्य किल्ला असलेल्या चेपॉकच्या मैदानावर सलग पाचवा सामना गमावला आहे. आजपर्यंत १८ वर्षांच्य इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं की चेन्नईने घरच्या मैदानावर इतके सामने गमावले आहेत. यासह पंजाब किंग्सविरूद्धच्या पराभवानंतर चेन्नईचा संघ यंदाच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. चेन्नईचा संघ आयरपीएल २०२५ च्या गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर आहे.