Gautam Gambhir meets Jay Shah as lengthy chat after KKR win : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमर रविवारी रात्री आयपीएल २०२४ चा फायनल सामना केकेआर आणि एसआरएच संघात पार पडला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवत १० वर्षांनी तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर केकेआरचे सर्व सदस्य जेतेपदानंतर आनंद साजरा करत असताना, संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आता गंभीरच्या भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची अटकळ पुन्हा सुरू झाली आहे.

केकेआरने विजेतेपदाचा दुष्काळ संपवला –

या हंगामापूर्वी, केकेआरने २०१२ आणि २०१४ मध्ये ट्रॉफी जिंकली होती आणि त्यावेळी संघाचा कर्णधार गौतम गंभीर होता. गंभीरच्या निवृत्तीनंतर केकेआरने जेतेपदाची दीर्घकाळ वाट पाहिली, पण आता गंभीर मार्गदर्शक बनल्याने कोलकाता टीम चॅम्पियन म्हणून उदयास आली. गंभीरने २०२२ च्या हंगामापासून आयपीएलमध्ये सामील झालेल्या लखनऊ सुपर जायंट्ससचा दोन वर्ष मार्गदर्शक राहिला. या दरम्यान गौतम गंभीरने दोनदा प्लेऑफ्समध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २०२३ च्या हंगामानंतर, शाहरुख खान गंभीरला पुन्हा संघात समाविष्ट करण्यात स्वारस्य दाखवत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि शेवटी गंभीर एक मार्गदर्शक म्हणून कोलकाता संघात परतला.

सोशल मीडियावर पुन्हा गौतमच्या नावाची चर्चा –

गंभीर आणि जय शाहच्या भेटीनंतर सोशल मीडियावर गंभीरबद्दल अटकळ सुरू झाली. पुढील महिन्यात होणाऱ्या टी विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, द्रविड आता संघासोबत राहणार नाही, त्यामुळे बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते.

या पदासाठी बीसीसीआयने गंभीरशी चर्चा केली असून तो भारताचा पुढील प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत गौतम गंभीर किंवा बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे असून येत्या काही दिवसांत संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत कोण आहे, याचे गूढ उलगडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – KKR vs SRH : ट्रॉफी जिंकण्यासोबत केकेआरचा मोठा पराक्रम, IPL च्या इतिहासात दुसऱ्यांदाच पाहायला मिळाला ‘हा’ विक्रम

जय शाह फायनल सामना पाहण्यासाठी होते उपस्थित –

आयपीएल २०२४ चा विजेतेपदाचा सामना रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी बीसीसीआयचे अधिकारीही स्टेडियममध्ये उपस्थित होते. जय शाह यांच्याशिवाय बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नीही फायनल सामना पाहण्यासाठी आले होते. यावेळी शाह आणि बिन्नी यांनी आयपीएल २०२४ विजेता संघ केकेआरला ट्रॉफी दिली.