Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Highlights: शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा चांगलाच पाहुणचार केला. गुजरातने पहिल्या डावात फलंदाजी करताना हैदराबादसमोर २२५ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादला अवघ्या १८६ धावा करता आल्या आहेत. गुजरात टायटन्सने हा सामना ३८ धावांनी आपल्या नावावर केला आहे.

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर हैदराबादला विजय मिळवण्यासाठी मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादला चांगल्या सुरुवातीची गरज होती. हैदराबादकडून सलामीला फलंदाजी करताना हेड आणि अभिषेक शर्माने ४९ धावांची भागीदारी केली. हेड २० धावा करत तंबूत परतला. त्यानंतर ईशान किशन १७ चेंडूत १३ धावांची खेळी करत माघारी परतला. या डावात अभिषेक शर्माने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीदरम्यान ४ चौकार आणि ६ षटकार मारले. क्लासेनने या डावात २३ धावांची खेळी केली. शेवटी नितीश कुमार रेड्डी आणि पॅट कमिन्सने मिळून काही आकर्षक फटके मारले, पण ही जोडी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

गुजरातने उभारला २२४ धावांचा डोंगर

या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. गुजरात टायटन्सकडून सलामीला आलेल्या शुभमन गिल आणि साई सुदर्शनने पुन्हा एकदा दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या. यादरम्यान साई सुदर्शनने २३ चेंडूत ४८ धावांची खेळी केली.

तर शुबमन गिलने ३८ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. या दोघांनी पाया रचल्यानंतर शेवटी जोस बटलरने संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली. बटलरने ३७ चेंडूत ६४ धावा चोपल्या. वॉशिंग्टन सुंदरने २१ धावा केल्या. यासह गुजरातने २० षटकांअखेर २२४ धावांचा डोंगर उभारला.

साई सुदर्शनने रचला इतिहास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज साई सुदर्शनने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत सचिन तेंडुलकरला मागे सोडलं आहे. या डावात फलंदाजी करताना साई सुदर्शनने २००० धावांचा पल्ला गाठला आहे. साई सुदर्शनने हा कारनामा ५४ व्या डावात करून दाखवला आहे. सचिन तेंडुलकरने हा कारनामा ५९ व्या डावात केला होता.