Tilak Verma’s reaction to Hardik’s leadership : आयपीएल २०२४ च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने आपली तयारी सुरु केली. याचाच भाग म्हणून रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करून, नवीन नेतृत्व रचना तयार करण्यात आली आहे. तथापि, पाच वेळच्या चॅम्पियनसाठी नवीन कर्णधाराकडे जाणे किती योग्य आहे, हे पाहण्यासाठी काही सामन्यांची प्रतिक्षा करावी लागेल. दरम्यान मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मासाठी, हार्दिकने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर फारसा बदल झालेला नाही. हार्दिक आणि रोहित दोघेही संघातील इतर खेळाडूंसाठी कसे उपलब्ध असतात? याबद्दल सांगितले.

हार्दिकला कर्णधार नियुक्त करण्यावर तिलक काय म्हणाला?

गुजरात टायटन्सविरुद्ध एमआयच्या सलामीच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत, तिलक वर्माला संघातील कर्णधार बदलाबाबत अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला. नवीन कर्णधार हार्दिकबद्दल त्यांच्याकडे फक्त चांगल्याच गोष्टी होत्या. तो म्हणाला, “रोहित आमच्यासाठी आहे आणि हार्दिक भाईही आमच्यासाठी आहे. सर्व काही पूर्वीसारखे आहे, मूलभूत गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. रणनीतीनुसार, सर्व काही ठीक चालले आहे. सर्व तेच आहे, नवीन काही नाही.”

‘हार्दिक कर्णधार आहे, पण रोहित नेहमीच…’ –

तिलकने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतात पदार्पण केले होते. आता तो त्यांच्याच नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ हंगामा खेळणार आहेत. हार्दिक हा संघाचा नियुक्त कर्णधार आहे. पण कर्णधार आणि इतर खेळाडूंना जेव्हा जेव्हा त्याच्या इनपुटची गरज असते, तेव्हा रोहित कसा उपलब्ध असतो. याबद्दल तिलक वर्माने सांगितले. तिलक वर्मा म्हणाला, “जेव्हा मी भारतासाठी खेळलो तेव्हा हार्दिकच्या नेतृत्वाखाली मी पदार्पण केले होते.आता पुन्हा त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळणे चांगले आहे. हार्दिक कर्णधार आहे, पण रोहित नेहमीच हार्दिक आणि संघासाठी उपलब्ध असतो. आम्ही एक संघ म्हणून एकत्र आहोत.”

‘भारताकडून खेळल्यानंतर परिपक्व खेळी खेळण्याची माझ्यावर जबाबदारी’ –

डावखुरा फलंदाज पुढे म्हणाला, “गेल्या वर्षीचा हंगाम चांगला होता पण आता एक वरिष्ठ खेळाडू म्हणून आणि भारताकडून खेळल्यानंतर परिपक्व खेळी खेळण्याची माझ्यावर थोडी मोठी जबाबदारी आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे, मला नेहमीच सामना फिनिश करण्याची जबाबदारी घ्यायची आहे. आता भारताकडून खेळत असल्याने मला याबद्दल चांगले ज्ञान आणि अनुभव आहे, म्हणून मी आता त्याचा वापर करण्यास उत्सुक आहे.”
याशिवाय तिलक वर्माच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिलक वर्माने मुंबई इंडियन्सकडून खेळताना आतापर्यंत २५ सामने आयपीएलमध्ये खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १४४ च्या स्ट्राइक रेटने ७४० धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याच्या बॅटमधून आतापर्यंत ३ अर्धशतके आली आहेत.