तब्बल दोन वर्ष बंदीची शिक्षा भोगून आल्यानंतर आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जाणारा चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसीला आपल्या ताफ्यात समाविष्ट करुन घेतलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन चेन्नई सुपर किंग्ज प्रशासनाने याविषयी माहिती दिली आहे.

याआधी हसीने खेळाडू म्हणून २००८ ते २०१३ या काळाच चेन्नई सुपर किंग्जचं प्रतिनिधीत्व केलं आहे. २०१४ साली हसी मुंबई इंडियन्सकडून खेळला यानंतर २०१५ साली तो परत चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाला. त्यामुळे आयपीएलमध्ये फलंदाज म्हणून हसीकडे असलेला पुरेसा अनुभव पाहता, त्याची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आलेली असल्याचं चेन्नई सुपर किंग्ज प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सोहळ्यात चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रविंद्र जाडेजा या खेळाडूंना कायम राखलं होतं. तब्बल १५ कोटी रुपये खर्च करुन चेन्नईच्या प्रशासनाने महेंद्रसिंह धोनीला आपल्या संघात कायम राखलं आहे. त्यामुळे आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानात पाहू शकणार आहेत.