कोलकाता विरूद्धच्या सामन्यात राजस्थानच्या संघाला स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. युवा सलामीवीर शुबमन गिल आणि इयॉन मॉर्गन यांच्या झुंजार खेळीच्या जोरावर कोलकाताने ६ बाद १७४ धावा केल्या होत्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने मात्र झटपट गडी गमावले. शेवटच्या काही षटकांमध्ये टॉम करनने फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं, पण तोपर्यंत सामना राजस्थानच्या हातून निसटला होता. कोलकाताचे नव्या दमाचे गोलंदाज कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी यांनी भेदक मारा करत संघाला ३७ धावांनी विजय मिळवून दिला.
That’s that from Match 12 as the @KKRiders win by 37 runs and register their second win of the season.#Dream11IPL #RRvKKR pic.twitter.com/WkssQH4pvD
— IndianPremierLeague (@IPL) September 30, 2020
१७५ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा आणि रियान पराग हे चौघे दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. अनुभवी रॉबिन उथप्पाच्या नावावर तर एक नकोसा विक्रम झाला. IPLमध्ये उथप्पाने त्याचा संघाचा ९१वा पराभव पाहिला. संघ पराभूत होताना त्या संघाचा भाग असण्याचा बाबतीत (part of defeats) विराट कोहली आघाडीवर होता. विराटने २००८ ते २०२० या कालावधीत ९० IPLसामन्यांमध्ये पराभवाचे तोंड पाहिले. परंतु कोलकाता विरूद्धच्या सामन्यात हा लाजिरवाणा विक्रम रॉबिन उथप्पाच्या नावे झाला. त्याने एकूण ९१वेळा पराभूत संघाचे प्रतिनिधित्व केले. या यादीत कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक तिसऱ्या (८७ पराभव) तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा चौथ्या (८५ पराभव) क्रमांकावर आहे.
दरम्यान, बुधवारच्या सामन्यात कोलकाताच्या संघाने राजस्थानला १७६ धावांचे आव्हान दिले. एकीकडे गडी बाद होताना शुबमन गिलने संयमी खेळी करत ४७ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त, इयॉन मॉर्गननेही संयमी खेळी केली. त्याने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत कोलकाताला १७०पार पोहोचवले. त्याने १ चौकार आणि २ षटकार लगावत २३ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची फलंदाजी ढेपाळली. टॉम करनने एकाकी झुंज देत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकलं पण त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. टॉम करनने नाबाद ५४ धावा केल्या. कोलकाताकडून नव्या दमाच्या शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि वरूण चक्रवर्थी या तिघांनी प्रत्येकी २ बळी टिपले.