Indian Premier League 2022 Live Streaming : आयपीएल क्रिकेटच्या १५ व्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होतीये. एकूण दहा संघांमध्ये क्रिकेटचे हे युद्ध रंगणार असून एकमेकांचा पराभव करण्यासाठी सर्वच संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत. आयपीएलच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी गतविजेता चेन्नई सुपर किंग्जशी उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स हा संघ दोन हात करणार आहे. हा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.

सामने किती होणार ? कोठे खेळवले जाणार ?

यावेळच्या आयपीएल हंगामामध्ये आणखी दोन संघांचा समावेश झाल्यामुळे एकूण दहा संघामध्ये लढती होणार आहेत. यावेळी एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता यावेळी सर्व सामने बायोबबलमध्ये खेळवले जातील. तसेच पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये असलेल्या मैदानावरच हे सामने होणार आहेत. आयपीएलचे बहुतांश सामने मुंबईमध्ये होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २०, ब्रेबॉर्न स्टेडियमवर १५, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर २० आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर १५ सामने खेळवले जाणार आहेत.

सामने कसे खेळवले जाणार ? नेमकं गणित काय ?

यंदाच्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ वाढल्यामुळे आतापर्यंतचेच दुहेरी राऊंड रॉबिन लीगचे सूत्र वापरले असते, तर सामन्यांची संख्या ९४ झाली असती. त्यामुळे १० संघांचे दोन गटांत विभाजन करून सामन्यांची संख्या ७४ (७० साखळी + ४ बाद फेरीचे) करण्यात आली आहे. यापैकी १२ दिवस दुहेरी सामने होतील. प्रत्येक संघाच्या वाट्याला साखळी टप्प्यात १४ सामने येतील. प्रत्येक संघाचा आपल्या गटातील अन्य चार संघांशी दोनदा सामना होईल. याशिवाय अन्य गटातील चार संघांशी एकदा, तर एका संघाशी दोनदा सामना होईल. ‘आयपीएल’मध्ये अशा प्रकारची कार्यक्रमपत्रिका २०११मध्ये वापरण्यात आली होती. त्यावेळी संघांची मांडणी मानांकनानुसार करण्यात आली.

आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक :

बारा दिवस दुहेरी सामने होणार

दोन महिन्यांमध्ये २७ मार्च, २ एप्रिल, ९ एप्रिल, १० एप्रिल, १६ एप्रिल, १७ एप्रिल, २३ एप्रिल, ३० एप्रिल, १ मे, ७ मे, ८ मे, १५ मे अशा एकूण १२ दिवशी दोन सामने होतील.

दहा संघांची दोन गटांमध्ये विभागणी केलेली आहे, ती खालीलप्रमाणे

अ-गट : मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स.

ब-गट : चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स.

सर्व सामने कोठे पाहता येतील ?

>>> आयपीएलचे सर्व सामने स्टार स्पोर्ट १, स्टार स्पोर्ट ३, स्टार गोल्ड २ या चॅनेल्सवर लाईव्ह पाहता येतील.

>>> तसेच सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग Disney+ Hotstar या अॅपवरदेखील पाहता येतील. त्यासाठी सबस्क्रीप्शन घेणे गरजेचे आहे.