पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सला सोमवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ५२ धावांनी आणखी एक लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १६५ धावा केल्या आणि त्यानंतर मुंबईचा संघ १७.३ षटकांत ११३ धावांत गुंडाळला. मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण फलंदाजांची खराब कामगिरी ठरली. त्यात कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे, जो केवळ २ धावा काढून टीम साऊदीच्या चेंडूवर यष्टिरक्षक जॅक्सनकरवी झेलबाद झाला. रोहितची विकेट खूपच वादग्रस्त होती आणि आता यासाठी अंपायरकडे बोट दाखवले जाऊ लागले आहे.
कोलकात्याकडून मिळालेल्या १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला डावाच्या पहिल्याच षटकात रोहितच्या रूपाने पहिला धक्का बसला. टीम साऊदीच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू रोहितच्या बॅटजवळून जात पॅडवर आदळला आणि यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सनच्या हातापर्यंत पोहोचला. जॅक्सनने अपील केले, पण अंपायरने नॉट आऊट दिला. तेव्हा केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला.




टीव्ही रिप्लेमध्ये पाहून थर्ड अंपायरने रोहितला आऊट दिले. रिप्ले पाहता, असे दिसून आले की चेंडू त्याच्या बॅटला लागण्यापूर्वी, अल्ट्रा-एज हलू लागला होता आणि खुणा तयार होऊ लागल्या होत्या. मात्र थर्ड अंपायरने रोहितला बाद घोषित केले. अंपायरच्या या निर्णयाने रोहित खूपच निराश दिसला आणि या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पॅव्हेलियनच्या दिशेने निघून गेला.
थर्ड अंपायरच्या निर्णयाने रोहित निराश तर झालाच, पण बाल्कनीत उभे असलेले प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि संघाचे मालक आकाश अंबानीही आश्चर्यचकित झाले. आकाश अंबानी यांना धक्का बसला आणि त्यांनी अंपायरकडे पाहिले. या निर्णयानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर अंपायरवर टीका सुरु केली आहे. सामन्यादरम्यान रोहित अंपायरच्या गोंधळाचा बळी ठरल्याचे चाहत्यांना वाटते.
मुंबईसमोर होते १६६ धावांचे लक्ष्य
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ९ बाद १६५ धावा केल्या. नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी ४३ धावांची खेळी खेळली. याशिवाय अजिंक्य रहाणेने २५ आणि रिंकू सिंगने नाबाद २३ धावांचे योगदान दिले. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने पाच आणि कुमार कार्तिकेयने दोन खेळाडूंना बाद केले. मुंबई इंडियन्सला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि अवघ्या ११३ धावांवर सर्व बाद झाले.
आयपीएल २०२२ मध्ये रोहित शर्मा कर्णधार आणि फलंदाज म्हणून काही विशेष करू शकला नाही. रोहितने आतापर्यंत ११ सामन्यांत १८.१८ च्या सरासरीने १९८ धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितचा स्ट्राइक रेट १२५ आहे आणि सर्वोत्तम धावसंख्या ४३ धावा आहे.