कुमार कार्तिकेय सिंहने आयपीएल २०२२ मधील पहिल्या विजयासह मुंबई इंडियन्सच्या संघात प्रवेश केला आहे. दुखापतग्रस्त मोहम्मद अर्शद खानच्या जागी कुमार कार्तिकेयचा संघात समावेश करण्यात आला आहे. कुमार कार्तिकेय सिंह देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो आणि मुंबईने त्याला २० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले आहे.
शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात मुंबईसाठी पदार्पण करणाऱ्या कुमार कार्तिकेय सिंहची गोष्ट काहीशी वेगळी आहे. आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात कुमार कार्तिकेयने सर्वांची मने जिंकली. त्याने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने सर्वांनाच चकित केले. आपल्या पहिल्याच सामन्यात कार्तिकेयने विरोधी संघाचा कर्णधार संजू सॅमसनची विकेट घेतली. याशिवाय कार्तिकेयने चार षटकांत केवळ १९ धावा दिल्या. कुमार मुंबई इंडियन्ससाठी भाग्यवान ठरला. आठ सामने गमावलेल्या मुंबईने शनिवारी विजयाचे खाते उघडले.
कुमार कार्तिकेयची कारकीर्द आव्हानांनी भरलेली
कुमार कार्तिकेयचे कारकीर्द संकटांनी भरलेले होते. एक वेळ अशी आली होती की, एकदा क्रिकेट सोडावे असे वाटले होत. पण ते सोडले तर काय करणार? असा प्रश्न कार्तिकेय पुढे निर्माण झाला होता. कुमारचे वडील उत्तर प्रदेश पोलिसात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना कार्तिकेयच्या संघर्षाविषयी सांगितले होते. मुलासाठी क्रिकेट किट खरेदी करण्यासाठी गेलेल्या श्यामनाथ यांना दुकानदाराने खरेदी करण्याची क्षमता नाही, मग दुकानात का आलात? असे म्हटले होते श्यामनाथ यांनी दुकानदाराला कोणतेही उत्तर न देता अर्धवट किट विकत घेतले आणि घरी परत आले. माध्यमांना काही वर्षांपूर्वी घडलेली घटना सांगताना श्यामनाथ सिंह भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. कुमार कार्तिकेय सिंह याची आयपीएल संघात निवड झाल्यानंतर शुक्रवारी त्याने फोन करून वडिलांना याबाबत माहिती दिली होती.
कार्तिकेय सिंहचा प्रवास
कार्तिकेय सिंग २८ एप्रिल रोजी बदली खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद अर्शद खानच्या दुखापतीमुळे त्याला संघात संधी मिळाली. मुंबईने कार्तिकेयला २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात घेतले. या युवा खेळाडूने आतापर्यंत नऊ प्रथम श्रेणी, नऊ टी-२० सामने खेळले असून, त्याने अनुक्रमे ३५ आणि १० बळी घेतले आहेत. कार्तिकेयचा जन्म उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे झाला असून त्याचे वडील उत्तर प्रदेश पोलिसात असून सध्या ते झाशी येथे हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. मात्र, कार्तिक मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तर त्याचा धाकटा भाऊ उत्तर प्रदेशच्या ज्युनियर संघाचा भाग आहे.
क्रिकेटर होण्यासाठी बराच काळ संघर्ष
आयपीएलमध्ये पोहोचण्याचा प्रवास कार्तिकेयसाठी सोपा नव्हता. कानपूरमधून त्याच्या खेळाला सुरुवात झाली. पण उत्तर प्रदेशकडून खेळताना यश न मिळाल्याने तो दिल्लीला गेला. येथे त्याने गौतम गंभीर, अमित मिश्रा यांसारख्या खेळाडूंना घडवणाऱ्या संजय भारद्वाजच्या अकादमीत नशीब आजमावले. मात्र येथेही संधी मिळाली नाही. त्यामुळे तो मध्य प्रदेशकडे वळला. येथे त्याला शहडोल विभागाच्या २३ वर्षांखालील संघासोबत खेळण्याची संधी मिळाली. हळूहळू त्याने मध्य प्रदेशच्या रणजी संघात स्थान मिळवले. लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला ट्रायल्ससाठी बोलावले होते पण मुख्य संघात समावेश करण्यात आला नाही. मात्र आता मुंबईने त्याला संधी दिली आहे.
यादरम्यान, कार्तिकेयला मोठा संघर्ष करावा लागला होता आणि याबाबत त्याने स्वतः खुलासा केला. “मी नऊ वर्षांपासून घरी गेलेलो नाही. मी ठरवले होते की जेव्हा काही बनेल तेव्हाच घरी जाईल. माझे आई वडील मला सारखे बोलवत होते. पण मी काहीतरी मोठं करुन दाखवण्याचा निश्चय केला होता. आता मी आयपीएलनंतर घरी जाणार आहे,” असे कार्तिकेयने म्हटले.