scorecardresearch

IPL 2023 Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals : हैदराबादविरुद्ध राजस्थानचे पारडे जड

या हंगामातही आक्रमक फलंदाज जोस बटलर आणि लेग-स्पिनर यजुवेंद्र चहल यांच्याकडून संघाला अपेक्षा असतील.

Bhuvneshwar Kumar
भुवनेश्वर कुमार संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

हैदराबाद : गेल्या हंगामातील उपविजेता राजस्थान रॉयल्सचा संघ इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) या हंगामात रविवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. तेव्हा राजस्थानचे लक्ष आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे असेल. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली संघाने गेल्या हंगामात चमकदार कामगिरी केली होती. त्यांच्या यजुवेंद्र चहलने ‘पर्पल कॅप’ आणि जोस बटलरने ‘ऑरेंज कॅप’ मिळवली होती.

बटलर, चहलकडे लक्ष 

या हंगामातही आक्रमक फलंदाज जोस बटलर आणि लेग-स्पिनर यजुवेंद्र चहल यांच्याकडून संघाला अपेक्षा असतील. गेल्या हंगामात बटलरने ८६३ धावा केल्या होत्या. तर, चहलने २७ बळी मिळवले होते. त्यामुळे हैदराबादच्या फलंदाजांना त्याच्यापासून सावध रहावे लागेल. चहलप्रमाणेच संघाकडे रविचंद्रन अश्विन आणि ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम झ्ॉम्पाचे पर्याय आहेत. बटलरच्या नेतृत्वाखालील संघाची फलंदाजीही भक्कम दिसत आहे. कर्णधार सॅमसन, युवा यशस्वी जैस्वाल, वेस्ट इंडिजचा शिमरॉन हेटमायर आणि जेसन होल्डर आक्रमक फटके मारण्यात सक्षम आहेत. यासह संघात इंग्लंडच्या जो रूटचा समावेश झाल्याने राजस्थानकडे फलंदाजीत चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. वेगवान गोलंदाजीची मदार नवदीप सैनी, होल्डर, संदीप शर्मा यांच्यावर असेल.

हैदराबादच्या फलंदाजांचा कस

गेल्या दोन हंगामात सनरायजर्स हैदराबाद संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. गेल्या हंगामात संघ आठव्या स्थानी राहिला. या हंगामात संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दक्षिण आफ्रिकेच्या एडीन मार्करमवर सोपवण्यात आली आहे. मात्र, पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार संघाची धुरा सांभाळेल. मार्करम नेदरलँड्सविरुद्धच्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर ३ एप्रिलला संघासोबत येईल. मार्करमसह मयांक अगरवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा आणि ग्लेन फिलिप्स यांच्या खांद्यावर संघाच्या फलंदाजीची जबाबदारी असेल.

’ वेळ : दुपारी ३.३० वा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 03:21 IST

संबंधित बातम्या