चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत यंदा प्रथमच कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आल्यावर ऋतुराज गायकवाडने दोन सामन्यांतच क्रिकेट जाणकारांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या आहेत. प्रथम माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी ऋतुराजच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले. आता चेन्नई सुपर किंग्ज संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी ऋतुराजमधील कर्णधाराला शंभर टक्के गुण दिले आहेत. ऋतुराज हा क्रिकेट जाणणारा माणूस असल्याचे हसी म्हणाले.

‘‘संघाने अचूक खेळाडूची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. ऋतुराज विलक्षण आहे. तो सामन्याची चांगली तयारी करतो. सामन्यापूर्वी प्रशिक्षक फ्लेमिंग आणि धोनीबरोबर डावपेचांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येतो,’’ असे हसी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> हार्दिक पांड्याची ‘ती’ चूक अन् मुंबईने सामना गमावला; माजी क्रिकेटपटूंनी मुंबईच्या कर्णधाराला झापलं

ऋतुराजने कर्णधार म्हणून निश्चित छाप सोडली आहे, असे मत व्यक्त करताना हसी म्हणाले, ‘‘ऋतुराज हा क्रिकेट जाणणारा माणूस आहे. तो ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करतो ते बघितले की त्याची मानसिकता स्पष्ट होते. गोलंदाजांनाही तो स्पष्ट संदेश देतो. विशेष म्हणजे त्याला संघ सहकाऱ्यांकडून चांगला पाठिंबा मिळत आहे.’’

हसी यांनी धोनीला फलंदाजीला न पाठविण्याचे देखील समर्थन केले. ‘‘मुळात खेळण्यासाठी खूप चेंडू नव्हते आणि समीर रिझवी चांगला फलंदाज आहे. फिरकी गोलंदाजीचा सामना करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. त्याने ती सिद्ध करून देखील दाखवली. धोनीच्या आधी त्याला संधी देणे हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय होता,’’ असे हसी म्हणाले.

हेही वाचा >>> IPL 2024 : ‘रन’ धुमाळीत हैदराबादची सरशी, मुंबई इंडियन्सवर ३१ धावांनी विजय

गेल्या वर्षीपासून आयपीएलमध्ये वापरला जाणारा प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेअर) या नियमामुळे धोनीचा फलंदाजीचा क्रम बदलला असे हसी यांनी सांगितले. ‘‘या नियमामुळे आम्हाला अधिक वेगवान खेळणाऱ्या फलंदाजाचा उपयोग करून घेता येतो. यामुळे आम्ही धोनीचा फलंदाजीसाठी आठवा क्रमांक निश्चित केला. अर्थात, यामुळे चाहत्यांची धोनीला फलंदाजी करताना बघायची प्रतीक्षा लांबली,’’ असेही हसी म्हणाले.

शिवम दुबेने फलंदाजीत कमालीची सुधारणा केली आहे. आखूड टप्प्याचे चेंडू शिवमला खेळता येत नाही असे म्हटले जात होते. मात्र, त्याने आपल्या फलंदाजीत कमालीची सुधारणा केली. विशेष म्हणजे त्याच्या प्रगतीवर धोनीचे लक्ष होते. शिवम आता गोलंदाजांना काही तरी नवे करून दाखविण्यास भाग पाडतो. हा सर्वात त्याच्या फलंदाजीत पडलेला मोठा फरक आहे. – मायकल हसी, फलंदाजी प्रशिक्षक, चेन्नई सुपर किंग्ज.