सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्समधील १६ मे रोजी होणारा सामना पावसामुळे रद्द झाला. यानंतर हैदराबाद संघ आयपीएल २०२४च्या प्लेऑफमध्ये धडक मारणारा तिसरा संघ ठरला आहे. यासह दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा संपुष्टात आल्या. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे आता एका जागेसाठी आरसीबी आणि सीएसकेचा संघ दोन दावेदार आहेत. आता या दोन्ही संघांपुढे प्लेऑफ गाठण्यासाठी कसे समीकरण असणार आहे, जाणून घ्या.

आरसीबीसाठी कसं आहे प्लेऑफचे समीकरण?

चेन्नई सुपर किंग्ज संघाची स्थिती पाहता आरसीबीचे प्लेऑफसाठीचे समीकरण थोडे कठीण आहे. प्लेऑफच्या शर्यतीत नेट रन रेटही महत्त्वाची भूमिका बजावतो, ज्यामध्ये चेन्नईचा संघ पुढे आहे. जर आरसीबीने चेन्नईविरुद्ध प्रथम फलंदाजी केली तर त्यांना किमान १८ धावांनी सामना जिंकावा लागेल. जर प्रथम गोलंदाजी केली तर ११ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकावा लागेल. ही गणितीय समीकरण पार पाडली तरच आरसीबीला प्लेऑफचे तिकीट मिळेल आणि चेन्नई सुपर किंग्ज बाहेर पडेल. जर RCB १८ पेक्षा कमी धावांनी किंवा ११ चेंडू शिल्लक असताना जिंकू शकला नाही, तरीही चेन्नई आपोआपच उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल.

हेही वाचा – IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?

चेन्नईसाठी कसं आहे प्लेऑफचे समीकरण?

चेन्नई सुपर किंग्ससाठी प्लेऑफचे समीकरण अगदी सहज आणि सोपे आहे. चेन्नईचा संध १३ सामन्यांत १४ गुणांसह ०.५२८ च्या चांगला नेट रन नेट असून चौथ्या क्रमांकावर आहे. तर आरसीबीचा संघ पाचव्या स्थानी आहे. चेन्नईने १८ तारखेच्या सामन्यात आऱसीबीला पराभूत केले तर सीएसकेचा संघ प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित करेल. चेन्नई सुपर किंग्जला गुणतालिकेत टॉप-२ मध्ये राहण्याचीही संधी आहे. जर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादने आपापले शेवटचे सामने गमावले आणि चेन्नईने आरसीबीला पराभूत केले तर ते गुणतालकितेत दुसऱ्या स्थानावर पोहोचतील. राजस्थानचे सध्या १६ गुण आहेत तर हैदराबाद १५ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. राजस्थानने त्यांचा अखेरचा सामना जिंकल्यास त्यांचे दुसरे स्थान निश्चित होईल. तर हा सामनाही राजस्थानने गमावला आणि हैदराबाद जिंकला तर कमिन्सचा संघ दुसऱ्या क्रमांकावर असेल.

हेही वाचा – IPL 2024: सलग सहा सामने गमावल्यानंतर कसं केलं दमदार पुनरागमन? RCB च्या खेळाडूनेच सांगितली इनसाईड स्टोरी

आऱसीबी सीएसके सामन्यात पाऊस पडल्यास काय होईल

पावसाचा थेट फायदा चेन्नई सुपर किंग्जला होणार आहे. शनिवारी बंगळुरूमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर पाऊस पडला तर चेन्नई सुपर किंग्ज १५ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचेल. तर आरसीबी १३ गुणांसह सहाव्या किंवा सातव्या स्थानावर राहील.