IPL 2024, Rajasthan Royals vs Gujarat Titans: गुजरात आणि राजस्थानमधील सामना फारच अटीतटीचा झाला. घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सचा तीन गडी राखून पराभव केला. रशीद खानने चमकदार कामगिरी करत शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला आणि गुजरातला मोसमातील तिसरा विजय मिळवून दिला.

– quiz

सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलशी संवाद साधत होते. भोगले यांनी गुजरातला दोन गुण मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या विजयाच्या स्वरूपाविषयी शंका व्यक्त करून ते म्हणाले, “शाबास, गुणतालिकेत तुम्ही आज दोन गुण मिळवले. आमच्यापैकी काहींना वाटले की सामना आता तुमच्या हातातून निसटला आहे, परंतु आजच्या तुमच्या कामगिरीसाठी तुम्हाला शाबासकी.”

यावर शुभमन गिल किंचितसा हसला आणि म्हणाला, “धन्यवाद. गुजरात टायटन्स जेव्हा खेळत असेल तेव्हा असा विचार करू नका हा…” हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गिल हसत हसत बोलणं संपवत आणि संघाकडे परत जायला निघतो.

गुजरात-राजस्थानच्या सामन्यात कर्णधार संजू सॅमसन (६८) आणि रियान पराग (७६) यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ३ बाद १९६ अशी उत्कृष्ट धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात गिलने ७७ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर राहुल तेवतियाची दमदार फलंदाजी आणि राशीद शेवटच्या चेंडूवरील चौकारामुळे गुजरातने सात विकेट्स गमावून लक्ष्य गाठले आणि मोसमातील आपला तिसरा विजय नोंदवला. या विजयासह गुजरात टायटन्स संघ आयपीएल २०२४च्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ अव्वल स्थानावर आहे.