IPL 2025 Qualification Scenario for MI and DC: आयपीएल २०२५ स्पर्धा शेवटच्या टप्प्याकडे वळत असताना अधिक चुरशीची होत आहे. आयपीएल २०२५ मधून ५ संघ स्पर्धेबाहेर झाले आहेत. तर ३ संघ प्लेऑफकरता क्वालिफाय झाले आहेत. त्यामुळे आता २ संघांमध्ये प्लेऑफसाठी चुरशीचा सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्क करण्याच्या अधिक जवळ जाईल.
गुजरात टायटन्स (GT), रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर लखनौ सुपर जायंट्स स्पर्धेबाहेर झाली आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामन्याकडे असणार आहे.
प्लेऑफमध्ये चौथे स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसमोर वेगळी आव्हानं आणि क्वालिफिकेशनची समीकरणं आहेत. कोणता संघ बाद फेरीत पोहोचतो हे ठरवण्यासाठी आगामी सामने महत्त्वाचे असतील. दिल्ली आणि मुंबईचा सामना नॉकआऊट असला तरी पंजाब किंग्सविरूद्ध सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे असतील.
मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफसाठी कसा क्वालिफाय करणार?
मुंबई इंडियन्स सध्या १२ सामन्यांनंतर १४ गुणांसह आणि +१.१५६ च्या मजबूत नेट रन रेट (NRR) सह चौथ्या स्थानावर आहे. मुंबईचे उर्वरित सामने पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहेत. मुंबई दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे १८ गुण होतील, ज्यामुळे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित होईल आणि संभाव्यतः टॉप-२ मध्ये स्थान मिळवता येईल. मुंबईला एकाही सामन्यातील पराभव त्यांचा प्लेऑफचा रस्ता गुंतागुंतीचा करू शकतो.
मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सविरूद्धचा सामना जिंकला तर जवळपास प्लेऑफलसाठी आपलं स्थान निश्चित करतील. पण जर मुंबई दिल्लीविरूद्ध पराभूत झाली. तर पंजाब किंग्सविरूद्ध दिल्ली पराभूत झाली पाहिजे अशी संघाला प्रार्थना करावी लागेल. तर मुंबईला पंजाब किंग्सचा शेवटच्या लीग सामन्यात पराभव करावा लागेल. याचबरोबर मुंबईला त्यांच्या सर्वाधिक नेट रन रेटचीदेखील मदत होईल.
दिल्ली कॅपिटल्स मुंबईला पराभवाचा धक्का देत प्लेऑफ गाठणार?
दिल्लीचा संघ १२ सामन्यांनंतर १३ गुणांसह आणि +०.२६० च्या नेट रन रेटसह पाचव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्धचे त्यांचे आगामी सामने महत्त्वाचे आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवल्याने त्यांचे १७ गुण होतील आणि प्लेऑफमधील स्थान मजबूत होईल. पण, दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झाल्यास दिल्लीचं आव्हान संपुष्टात येईल. मुंबईविरुद्धचा सामना दिल्लीसाठी विशेषतः महत्त्वाचा आहे, कारण विजयामुळे फक्त दिल्लीचे गुण वाढतीलच असं नाही तर मुंबई इंडियन्सलाही याचा धक्का बसेल.
मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामना २१ मे रोजी संध्याकाळी ७.३० वाजता आहे, जो एक नॉकआऊट सामना म्हणून खेळवला जाईल. तर दोन्ही संघांचे पंजाब किंग्सविरूद्धचे सामने प्लेऑफचे संघ निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरतील.