लोकसभा निवडणुकांमुळे खोळंबा झालेलं इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. निवडणुकांमुळे पोलीस तसंच बाकी यंत्रणांवर ताण असणार आहे. त्यामुळे आयपीएल व्यवस्थापनाने ७ एप्रिलपर्यंतच्या सामन्यांसाठीचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. निवडणुकांच्या तारखा स्पष्ट झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केलं जाईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल फायनल २६ मे रोजी चेन्नई इथे होणार आहे. तब्बल १२ वर्षानंतर आयपीएल फायनल चेन्नईतच होणार आहे. चेन्नईतच क्वालिफायर२चा सामनाही खेळवण्यात येईल. क्वालिफायर१ आणि एलिमिनेटर हे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत होणार आहेत.

हंगामाची सलामीची लढत आणि अंतिम मुकाबला एकाच ठिकाणी खेळवण्याची परंपरा आयपीएल प्रशासनाने कायम राखली आहे. यंदाच्या हंगामाची सलामीची लढत चेन्नईतच झाली होती.

२००९ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचा अख्खा हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. करोनामुळे २०२० आणि २०२१ हंगाम युएईत आयोजित करण्यात आला होता. यंदा आयपीएलच्या काळातच निवडणुका असल्याने स्पर्धेचं आयोजन कुठे होणार यासंदर्भात प्रश्नचिन्ह होतं. मात्र आयपीएल प्रशासनाने हंगाम भारतातच खेळवण्यात येईल असं स्पष्ट केलं.

चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघांनी प्रत्येकी ५वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने दोनवेळा तर राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स, गुजरात टायटन्स यांनी प्रत्येकी एकदा जेतेपदाची कमाई केली आहे. गेल्या वर्षी अटीतटीच्या अंतिम मुकाबल्यात चेन्नईने गुजरातला नमवत जेतेपदावर कब्जा केला होता.

मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामात नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाने मुंबईने तब्बल ५ जेतेपदं जिंकली आहेत. रोहितला कर्णधारपदापासून बाजूला केल्याने मुंबई इंडियन्सला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. सलामीच्या लढतीत गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांचा पराभव झाला होता. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात मुंबईला जेतेपदासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

मुंबई इंडियन्सचे उर्वरित सामने
२४ मार्च विरुद्ध गुजरात टायटन्स- अहमदाबाद
२७ मार्च विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद- हैदराबाद
१ एप्रिल विरुद्ध राजस्थान रॉयल्स- मुंबई
७ एप्रिल विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- मुंबई
११ एप्रिल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- मुंबई
१४ एप्रिल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स-मुंबई
१८ एप्रिल विरुद्ध पंजाब किंग्ज- मोहाली

२२ एप्रिल विरुद्ध राजस्थान- जयपूर
२७ एप्रिल विरुद्ध दिल्ली- दिल्ली
३० एप्रिल विरुद्ध लखनौ- लखनौ
३ मे विरुद्ध कोलकाता- मुंबई
६ मे विरुद्ध हैदराबाद- मुंबई
११ मे विरुद्ध कोलकाता- कोलकाता
१७ मे विरुद्ध लखनौ- मुंबई