आयपीएल २०२४ च्या मोसमातील शेवटचा सामना खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामात सुमार कामगिरीमुळे आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. १७ मे रोजी म्हणजेच शुक्रवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. मुंबई इंडियन्स या मोसमातील शेवटचा सामना त्यांच्या घरच्या मैदानावर जिंकून किमान चाहत्यांना आनंदाचे क्षण देण्याचा प्रयत्न करतील. घरच्या मैदानावरील या अखेरच्या सामन्यासाठी संघ तयारी करत आहे. मात्र, याआधी मुंबईने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांचे दोन खेळाडू कुस्ती करताना दिसत आहेत.

मुंबईने शेअर केलेल्या या व्हीडिओमध्ये भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू टीम डेव्हिड हे चक्क कुस्ती खेळत आहेत. दोघेही एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहेत. यष्टीरक्षक फलंदाज आपली सर्व शक्ती वापरत टीमला प्रतिकार करत आहे. बचाव करत असतानाच इशानही अष्टपैलू खेळाडूचे दोन्ही पाय पकडतो, पण धिप्पाड असलेला टिम काही वेळातच स्वतःची सुटका करून घेतो. या ३० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक वेळ अशी येते, जेव्हा दोघेही एकमेकांना पाठीवर पाडण्याचा प्रयत्न करतात. हे दोघेही एकमेकांना टक्कर देत असले तरी इशान किशन धिप्पाड टीम डेव्हीडवर थोडा भारी पडत होता.

हेही वाचा – RR v PBKS: टॉम कोहलर कॅडमोर गळ्यात नेमकं काय घालून उतरला होता? त्या उपकरणाचा उपयोग काय, जाणून घ्या

मात्र, संपूर्ण व्हिडिओमध्ये दोघे मस्ती मस्करीत कुस्ती खेळताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करताना मुंबई इंडियन्सने लिहिले – सावधान… हे पूर्णपणे प्रशिक्षित व्यावसायिक खेळाडू आहेत. कृपया हे घरी करून पाहू नका. असे म्हणत हसण्याचा इमोजीही त्यांनी पुढे टाकला आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील संघाने १३ पैकी ९ सामने गमावून पॉइंट टेबलमध्ये १०व्या क्रमांकावर आहे. ८ गुण खात्यात असून मुंबई संधाने यंदा आपल्या कामगिरीने सर्वांनाच निराश केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई घरच्या मैदानावरील शेवटच्या सामन्यात बेंचवर बसलेल्या खेळाडूंनी खेळण्याची संधी देईल, अशी चर्चा सुरू आहे. यंदाच्या मोसमात सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. या अखेरच्या सामन्यात अर्जुन खेळताना दिसेल अशी आशा आहे.