इशांत शर्मा म्हणजे भारताचा अनुभवी आधारवड गोलंदाज. कसोटी प्रकारात भारताला अव्वल स्थान मिळवून देण्यात इशांतची भूमिका मोलाची राहिली आहे. आयपीएल स्पर्धेत असंख्य चढउतार अनुभवलेल्या इशांतने यंदाच्या हंगामात एक अनोखं वर्तुळ पूर्ण केलं. सहा विभिन्न दशकातील फलंदाजांना गोलंदाजी करण्याचा विक्रम इशांतने नावावर केला. आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात इशांत खेळला तेव्हा त्याचं वय १८ होतं. त्यावेळी सनथ जयसूर्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात होता. जयसूर्याचं वय होतं ३९. आयपीएलच्या यंदाच्या म्हणजेच १८व्या हंगामात इशांत ३६ वर्षांचा आहे आणि १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी त्याचा सामना करतो आहे. एकप्रकारे इशांतसाठी एक वर्तुळ पूर्ण झालं आहे.

इशांत पहिल्यावहिल्या आयपीएल हंगामाचा भाग होता. पोरगेला दिसणारा इशांत त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. टप्पा पडून आत येणारा चेंडू हे इशांतचं बलस्थान. त्या बळावर तो भल्याभल्यांची भंबेरी उडवत असे. याच हंगामात इशांतने श्रीलंकेचा अनुभवी धडाकेबाज सलामीवीर सनथ जयसूर्याला बाद केलं. जयसूर्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. जयसूर्याचा जन्म १९६९ सालचा. सत्तरीच्याही आधी जन्मलेल्या जयसूर्याला गोलंदाजी करत त्याला बाद करण्याचं नैपुण्य इशांतकडे होतं. २९ एप्रिल २००८ रोजी मुंबई-कोलकाता लढतीत इशांतने सनथ जयसूर्याला त्रिफळाचीत केलं होतं.

आयपीएलच्या पुढच्या हंगामांमध्ये इशांतने ७० आणि ८०च्या दशकात जन्मलेल्या असंख्य फलंदाजांना बाद केलं. सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, तिलकरत्ने दिलशान, युवराज सिंग, ख्रिस गेल, महेंद्रसिंग धोनी, शॉन पोलॉक अशा असंख्य फलंदाजांचा यात समावेश आहे.

पुढच्या कालखंडात इशांत विराट कोहली, रोहित शर्मा या नव्वदच्या दशकात जन्मलेल्या खेळाडूंविरुद्ध खेळला. दिल्लीकर विराट कोहली हा कोहलीचा खास मित्र. मैदानाबाहेर खास दोस्त असणारे हे दोघं मैदानावर मात्र एकदम हाडवैरी होऊन जातात. रवींद्र जडेजा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, डेव्हिड वॉर्नर,

२०००च्या दशकात म्हणजे २००१ ते २००९ जन्मलेल्या फलंदाजांना इशांतने गोलंदाजी केली तसंच त्यांना बादही केलं.

यंदाच्या हंगामात इशांतने २०११ मध्ये जन्मलेल्या राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी केली. हंगामापूर्वी झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सने १४वर्षीय वैभवला ताफ्यात समाविष्ट केलं तेव्हाच जोरदार चर्चा झाली होती. बिहारमधल्या समस्तीपूरच्या वैभवने आपल्या बॅटचा तडाखा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दाखवला होता. त्याची दखल राजस्थान संघव्यवस्थापनाने घेतली. यंदाच्या हंगामात वैभवला संधी मिळणार नाही असं वाटलं होतं पण राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणात खेळणाऱ्या राजस्थानने वैभवला संधी दिली. वैभवने या संधीचं सोनं केलं. गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत वैभवने ३५ चेंडूतच शतक झळकावलं. १४व्या वर्षी बाकीचं मुलं शालेय अभ्यासात दंग असताना वैभवने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांचा समाचार घेत वादळी शतक झळकावलं. वैभवच्या षटकारांनी माजी क्रिकेटपटूही चकित झाले. वैभवच्या बॅटचा तडाखा इशांत शर्मालाही बसला. इशांतच्या २ षटकात ३६ धावा वसूल झाल्या. इशांतच्या पहिल्याच षटकात जोस बटलरने यशस्वी जैस्वालचा झेल सोडला. या जीवदानाचा फायदा उठवत यशस्वीने शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला.

इशांतच्या दुसऱ्या षटकात वैभवने दोन तडाखेबंद षटकार लगावले. २०११ साली जन्मलेल्या वैभवने २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या इशांतचं दडपण न घेता षटकारांची लयलूट केली. तिसऱ्या चेंडूवर वैभवने चौकार लगावला. पाचव्या चेंडूवर वैभवने उत्तुंग षटकार मारला. या प्रहारामुळे लय बिघडलेल्या इशांत शर्माच्या हातून दोन वाईड चेंडू टाकले. शेवटच्या चेंडूवर वैभवने आणखी एक चौकार लगावत इशांतच्या जखमेवर मीठ चोळलं.

वैभवने असं आक्रमण केल्याने गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने पुन्हा इशांतला गोलंदाजीच दिली नाही. ३६वर्षीय इशांतला यंदाच्या हंगामात खेळताना प्रचंड उकाड्याचा त्रास जाणवतो आहे. काही दिवसांपूर्वी एका सामन्यादरम्यान प्रचंड उष्णता आणि आर्द्रतेमुळे त्याने मैदान सोडलं होतं. शुक्रवारी झालेल्या लढतीत इशांतने डावाचे शेवटचे षटक टाकायला घेतले. मात्र दुसरा चेंडू टाकताना इशांत दुखापतग्रस्त झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निसर्गदत्त उंचीचं वरदान लाभलेल्या इशांत शर्माचं लंबू असं टोपणनाव आहे. इशांतने १०५ टेस्ट, ८० वनडे आणि १४ ट्वेन्टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३११ विकेट्स आहेत. आयपीएल स्पर्धेत २००८ ते २०१० कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला. २०११-१२ तो डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळला. २०१३ ते २०१५ तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. २०१६ मध्ये तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघात होता. २०१७ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात होता. २०१८ हंगाम तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. २०१९ ते २०२४ तो दिल्ली कॅपिटल्सचा हिस्सा आहे. यंदाच्या वर्षी इशांत गुजरात टायटन्सचा भाग आहे. इशांतने सात विविध आयपीएल संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.