Mumbai Indians Beat Rajasthan Royals by 100 Runs: मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सच्या त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव करत एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. मुंबईचा संघ २०१२ पासून जयपूरमध्ये एकही सामना जिंकला नव्हता. मुंबईने आता १३ वर्षांनंतर या मैदानावर १०० धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. मुंबई इंडियन्सने सांघिक कामगिरीच्या जोरावर राजस्थानवर एकतर्फी विजय मिळवला.

मुंबई इंडियन्सचा संघ राजस्थान रॉयल्सचा पराभव करत सलग सहाव्या विजयासह गुणतालिकेत १४ गुणांसह आणि कमालीच्या नेट रन रेटसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. आता मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी ३ सामन्यात एका विजयाची गरज आहे. यासह राजस्थान रॉयल्सचा संघ यंदाच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरला आहे.

मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करत राजस्थानला २१८ धावांचे आव्हान दिले. राजस्थानचा संघ १६ षटकांत ११७ धावा करत सर्वबाद झाला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या फलंदाजांना फार वेळ मैदानावर राहू दिलं नाही आणि राजस्थानची फलंदाजी फळी पत्त्यांसारखी कोसळली. पहिल्याच षटकात दीपक चहरने चर्चेत असलेल्या १४ वर्षीय शतकवीर वैभव सूर्यवंशीला झेलबाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. तर दुसऱ्या षटकात ट्रेंट बोल्टने दोन षटकार खाल्ल्यानंतर यशस्वी जैस्वालला क्लीन बोल्ड केलं. यानंतर नितीश राणाला बोल्टने ९ धावांवर माघारी धाडलं.

बुमराहने येताच पहिल्या षटकात कर्णधार रियान परागला १६ धावांवर रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. तर शिमरॉन हेटमायरला गोल्डन डकवर बुमराहने झेलबाद केलं. यानंतर लगेच पुढच्याच षटकात शुभम दुबे १५ धावा करत झेलबाद झाला. यानंतर कर्ण शर्माने एकट्यानं ध्रुव जुरेल, महिश तीक्ष्णा आणि कुमार कार्तिकेयला माघारी धाडलं. कर्ण शर्माने एका षटकात दोन विकेट घेतले. यानंतर बोल्टने १७व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरला झेलबाद केलं. आर्चरने राजस्थानकडून सर्वाधिक धावा केल्या. आर्चरने २७ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३० धावा केल्या.

मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतली. यानंतर जसप्रीत बुमराहने २ विकेट्स तर दीपक चहर, हार्दिक पंड्या यांनी १-१ विकेट घेतली. फक्त कार्बिन बॉश वगळता मुंबईच्या सर्व गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या.

राजस्थानने नाणेफेक गमावत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि मुंबईचा संघ फलंदाजीसाठी उतरला. मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने पहिल्या विकेटसाठी मोठी ११६ धावांची भागीदारी रचली. रायन रिकल्टन ३८ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. तर रोहित शर्माला दुसऱ्याच षटकात अगदी एक सेकंद बाकी असताना घेतलेल्या रिव्ह्यूमुळे जीवदान मिळालं. यानंतर हिटमॅनने ३६ चेंडूत ९ चौकारांसह ५३ धावांची खेळी केली. तर नंतर आलेले सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी ४८-४८ धावांची खेळी केली.

सूर्यकुमारने २३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४८ धावा केल्या. तर हार्दिकने २३ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ४८ धावांची खेळी केली. यासह मुंबईने टॉप-४ फलंदाजांच्या जोरावर २ विकेट्स गमावत २० षटकांत २१७ धावा केल्या.