मुंबई : यंदाच्या हंगामात हार्दिक पंड्याला बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. त्याच्याविरोधात सतत शेरेबाजी झाली आणि हे पाहून मला हार्दिकसाठी खूप वाईट वाटले. मैदानाबाहेरील विविध गोष्टींचा केवळ हार्दिक नाही, तर आमच्या संपूर्ण संघाच्याच कामगिरीवर परिणाम झाल्याचे मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरने नमूद केले.

मुंबईच्या संघाला शुक्रवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून १८ धावांनी पराभव पत्करावा लागला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाने यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. एकूण १४ पैकी १० सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली. त्यामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाला राहिला. यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिककडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याचा मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने निर्णय घेतला. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय मुंबईच्या चाहत्यांना आवडला नाही. त्यांनी आपली नाराजी समाजमाध्यमे आणि प्रत्यक्ष स्टेडियममध्ये हार्दिकविरोधात शेरेबाजी करत व्यक्त केली.

‘‘हार्दिकच्या भोवती बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. याचा त्याच्या निर्णयक्षमतेवर काहीसा परिणाम झाला. त्याला केवळ क्रिकेटवर लक्ष केंद्रित करता येत नव्हते. कर्णधार म्हणून त्याला बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. आमच्या ड्रेसिंग रूममध्ये त्याला सर्वांकडूनच खूप पाठिंबा मिळाला. आमचे सर्वच खेळाडू त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सतत तुमच्या विरोधात शेरेबाजी होत असल्यास खेळाडू म्हणून तुमचे काम खूप अवघड होऊन जाते. आता आम्हाला काही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, जेणेकरून भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये,’’ असे बाऊचर म्हणाला.

हेही वाचा >>> IPL 2024 : राजस्थान विजयपथावर परतण्यास उत्सुक; गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या कोलकाताशी आज सामना

यंदाच्या हंगामात अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले असले, तरी हार्दिकच्या नेतृत्वक्षमतेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे बाऊचरने स्पष्ट केले. ‘‘आता आमच्या संघाच्या कामगिरीचे पुनरावलोकन केले जाईल. मात्र, कोणताही भावनिक निर्णय घेतला जाईल असे मला वाटत नाही. मुंबईच्या फ्रँचायझीला हार्दिकच पुढे कर्णधार म्हणून हवा असेल याची मला खात्री आहे. आम्ही काही काळानंतर याबाबत सखोल चर्चा करू,’’ असेही बाऊचरने सांगितले. तसेच मुख्य प्रशिक्षक म्हणून आपले पदही धोक्यात येऊ शकते याची बाऊचरला जाणीव आहे. मात्र, कोणताही निर्णय इतक्यात घेतला जाणे अपेक्षित नसल्याचेही बाऊचर म्हणाला.

हेही वाचा >>> IPL 2024 : हैदराबादसमोर पंजाबचे आव्हान

मला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश – रोहित

● यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात आपल्याला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आल्याची कबुली मुंबई इंडियन्सचा तारांकित फलंदाज रोहित शर्माने दिली.

● रोहितने यंदाच्या हंगामाची अप्रतिम सुरुवात केली होती. मात्र, त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. यंदाच्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात तो धावांसाठी झगडताना दिसला. अखेरच्या सातपैकी पाच सामन्यांत तो एकेरी धावसंख्येवर बाद झाला.

● ‘‘यंदाच्या हंगामात फलंदाज म्हणून मला अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. मी स्वत:साठी एक स्तर निश्चित केला आहे आणि तो गाठण्यात मी अपयशी ठरलो. मात्र, आता इतकी वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर, अतिविचार केल्यास मी चांगली कामगिरी करू शकत नाही हे मला समजले आहे. त्यामुळे मी फार विचार करणे टाळले. मी सकारात्मक मानसिकता राखण्याचा, सतत सराव करत राहण्याचा आणि माझ्या खेळातील उणिवा दूर करत राहण्याचा प्रयत्न केला,’’ असे रोहित म्हणाला.

रोहितचे भविष्य त्याच्याच हाती

रोहित शर्माचे भविष्य त्याच्याच हातात असून पुढील हंगामाच्या खेळाडू लिलावापूर्वी तो काय निर्णय घेणार हे ठाऊक नसल्याचे बाऊचर म्हणाला. ‘‘रोहितच्या भविष्याबाबत आम्ही फारशी चर्चा केलेली नाही. मी काल रात्रीच त्याच्याशी संवाद साधला. यंदाच्या हंगामाबाबत त्याला काय वाटले हे मला जाणून घ्यायचे होते. ‘आता रोहित शर्मासाठी पुढे काय?’ असे मी त्याला विचारले. यावर ‘ट्वेन्टी-२० विश्वचषक’ असे त्याने उत्तर दिले. मला रोहितच्या भविष्याबाबत इतकेच काय ते ठाऊक आहे. रोहितचे भविष्य त्याच्याच हातात आहे. पुढील ‘आयपीएल’ हंगामापूर्वी खेळाडूंचा महालिलाव होणार आहे. त्यापूर्वी रोहित काय निर्णय घेणार हे कोणालाही ठाऊक नाही,’’ असे बाऊचरने शुक्रवारी झालेल्या लखनऊविरुद्धच्या सामन्यानंतर सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्दिकवर एका सामन्याची बंदी

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात षटकांची गती धिमी राखल्याबद्दल मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय मुंबईकडून षटकांची गती धिमी राखण्याचा प्रकार या हंगामात तिसऱ्यांदा घडल्याने हार्दिकवर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली आहे. मुंबईचे आता साखळी सामने संपले असून त्यांनी बाद फेरीही गाठलेली नाही. त्यामुळे हार्दिकला ‘आयपीएल’च्या पुढील हंगामातील पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे. तसेच मुंबई संघातील अन्य सर्व खेळाडूंकडून सामन्याच्या मानधनातील ५० टक्के रक्कम किंवा १२ लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल, ती दंडाच्या स्वरूपात आकारली जाईल.