पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीगचे सामने खेळवले जात आहेत. यादरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय लष्कराने पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. बुधवारी, ७ मे रोजी, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. यानंतर पाकिस्तानच्या कुरघोडींवर भारतही चोख उत्तर देत आहे. यामुळे आता पीएसएलचा सामना रद्द करण्यात आला.

भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर करत पहलगाम हल्ल्याचं पाकिस्तानला उत्तर दिलं. या मोहिमेअंतर्गत, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केले. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा परिणाम पाकिस्तानमध्ये होणाऱ्या पीएसएलवरही दिसून येत आहे.

“पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्व भागधारकांशी सल्लामसलत करून, आज रात्री पेशावर झाल्मी आणि कराची किंग्ज यांच्यातील एचबीएल पीएसएल एक्स सामना पुन्हा दुसऱ्या दिवशी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबी योग्य वेळी सुधारित तारीख जाहीर करेल,” असे क्रिकेट बोर्डाने एका मीडिया निवेदनात म्हटले आहे.

गुरुवारी, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामन्याच्या ठिकाणातही बदल करण्यात आला, तर ११ मे रोजी धरमशाला येथे होणारा सामना अहमदाबाद येथे हलवण्यात आला आहे. पाकिस्तानमधील लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर धरमशाला येथील विमानतळ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे संघांच्या प्रवासावर याचा परिणाम होणार असल्याने सामन्याचे ठिकाण बदलले आहे.

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या लष्करी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर धरमशाला येथील विमानतळ किमान १० मे पर्यंत व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद करण्यात आले आहे.

गुरुवारी धरमशालामध्ये पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. धरमशालामधील विमान वाहतूक बंद असल्याने पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघ कसे प्रवास करणार यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. चंदीगड विमानतळ देखील बंद असल्याने, संघांना दिल्लीला जाण्यासाठी मार्ग शोधावा लागेल.