PBKS vs MI Qualifier 2, Weather Update: आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. पंजाब किंग्जला क्वालिफायर १ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. तर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरचा सामना जिंकून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी अंतिम फेरी गाठण्याची ही शेवटची संधी असणार आहे. दरम्यान हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर अंतिम फेरीत कोण जाणार? जाणून घ्या.
क्वालिफायर २ चा सामना रद्द झाला तर?
आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर २ सामन्यासाठी. राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर सामना रद्द झाला, तर ही दोन्ही संघांसाठी टेन्शन वाढवणारी बाब असणार आहे. साखळी फेरीतील सामन्यांमध्ये जर सामना काही कारणास्तव रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी १–१ गुण दिला जातो. मात्र, बाद फेरीतील सामन्यांमध्ये नियम जरा वेगळे आहेत.
बीसीसीआयने या हंगामासाठी नव्या नियमांची घोषण केली होती. ज्यात सामना सुरू करण्यासाठी अतिरिक्त वेळ देणार असल्याच्या नियमाचा समावेश होता. जर सामना पावसामुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे थांबला, तर सामना सुरू करण्यासाठी अतिरिक्त १२० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. त्यामुळे सामन्याला ९ वाजता देखील सुरूवात होऊ शकते. मात्र, जर सामना रद्द झाला तर कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेन? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर, गुणतालिकेत सर्वाधिक गुणांची कमाई करणाऱ्या संघाला अंतिम फेरीत जाण्याचा मान मिळेल.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाने आयपीएल २०२५ स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. या संघाने १४ पैकी ९ सामने जिंकले. यासह हा संघ १९ गुणांसह अव्वल स्थानी राहिला. तर ८ सामने जिंकून मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी राहिला. त्यामुळे जर सामना रद्द झाला, तर पंजाब किंग्जचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. मात्र, कमीत कमी ५–५ षटकांचा सामना खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रश्न असेल.
कसं असेल हवामान?
हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. या सामन्यावेळी ३५ डिग्री सेल्सिअस इतकं राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सामन्यावेळी ढगाळ वातावरण असेल. मात्र,पाऊस पडण्याची कुठलीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना २०–२० षटकांचा सामना पाहायला मिळेल.