Ritika Sajdeh Reaction: दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा पूर्णपणे फ्लॉप ठरला. या सामन्यात रोहित शर्मा ५ चेंडूत अवघ्या ५ धावा करत माघारी परतला. वानखेडे स्डेडियमवर रोहित शर्मा स्टँडचं अनावरण करण्यात आलं आहे. या स्टँडचं अनावरण झाल्यानंतर, रोहित पहिल्यांदाच वानखेडे स्टेडियमवर फलंदाजी करण्यासाठी आला होता. मात्र, त्याची बॅट शांत राहिली. दरम्यान रोहित बाद होऊन माघारी असताना रितिका सजदेहने दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी रोहित शर्मा तुफान फॉर्ममध्ये होता. त्याने लागोपाठ अर्थशतकं झळकावली होती. आता आयपीएल पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. रोहित शर्मा स्टँडसमोर फलंदाजीला येण्याची ही रोहितची पहिलीच वेळ होती. मात्र, तो अवघ्या ५ धावा करत तंबूत परतला. या खेळीदरम्यान त्याने एक चौकार मारला. त्याला मुस्तफिजुर रहमानने झेलबाद करत माघारी धाडलं. ज्यावेळी रोहित बाद होऊन डगआऊटच्या दिशेने जात होता, त्यावेळी कॅमेरामनने कॅमेरा रितिकाकडे फिरवला. त्यावेळी ती नाराज असल्याचे दिसून आले. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबईने उभारला १८० धावांचा डोंगर
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला हवी तशी सुरूवात करता आली नाही.
रोहित शर्मा अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रायन रिकल्टनने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो देखील २५ धावांवर तंबूत परतला. सलामी जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर विल जॅक्सवर मोठी जबाबदारी होती. त्याने काही आक्रमक फटके मारले. पण, तो देखील २१ धावांवर माघारी परतला. मुंबईकडून सूर्यकुमार यादव चमकला. त्याने ४३ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ७३ धावांची खेळी केली. आधी तिलक वर्माने सूर्यकुमार यादवला चांगली साथ दिली. शेवटी नमन धीरने दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने ८ चेंडूंचा सामना करत २ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने २४ धावा चोपल्या. यासह मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर ५ गडी बाद १८० धावांचा डोंगर उभारला.
हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकण्यासाठी १८१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्टने दिल्लीच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. दिल्लीचा संपूर्ण डाव अवघ्या १२१ धावांवर आटोपला. यासह मुंबईने हा सामना ५९ धावांनी आपल्या नावावर केला.