Rohit Sharma DRS Controversy, IPL 2025: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारला. गेल्या १३ वर्षांपासून मुंबईला जयपूरमध्ये एकही सामना जिंकता आला नव्हता. अखेर मुंबईने पराभवाची मालिका थांबवून विजयी पताका फडकवला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या विजयासह आणखी एक गोष्टीची जोरदार चर्चा होत आहे. ती म्हणजे रोहितने घेतलेल्या डीआरएसची. रोहितने डीआरएस घेण्याची वेळ संपत असताना अंपायरकडे इशारा केला असल्याचं म्हटलं जात आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

रोहितने घेतलेल्या डीआरएसवरून पेटला वाद

या सामन्यात फलंदाजी करत असताना गोलंदाजाचा चेंडू हा रोहितच्या पॅडला जाऊन लागला. त्यावेळी अंपायरने त्याला बाद घोषित केलं. फलंदाज बाद झाल्यानंतर जर त्याला तिसऱ्या पंचांकडे डीआरएसची मागणी करायची असेल तर त्यासाठी १५ सेकंदाचा वेळ दिला जातो. या १५ सेकंदात फलंदाजाला डीआरएस घ्यायचा की नाही, ठरवायचं असतं. मात्र, रोहितने १५ सेकंदांहून जास्त वेळ घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

रोहितने डीआरएस घेतल्यानंतर अंपायरच्या निदर्शनात आलं की, चेंडू हा लेग स्टंप लाईनच्या बाहेर पडला होता. त्यामुळे रोहित थोडक्यात बचावला. त्यानंतर रोहितने अर्धशतकी खेळी केली. जर रोहित डीआरएस न घेताच माघारी परतला असता तर मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला असता. रोहितने रिकल्टनसोबत मिळून सलामीला फलंदाजी करताना ११६ धावांची दमदार भागीदारी केली. या भागीदारीमुळे मुंबईने विजयाचा भक्कम पाया रचला. या सामन्यात रोहितने मुंबई इंडियन्स संघासाठी फलंदाजी करताना ६००० धावांचा पल्ला देखील गाठला.

ज्यावेळी अंपायरने आपला निर्णय सांगितला, त्यावेळी असं वाटत होतं की रोहित डीआरएस न घेताच माघारी जाईल. त्यावेळी टायमर सुरू होता. ज्यावेळी टायमर शून्यावर पोहोचला त्याचवेळी रोहितने अंपायरकडे इशारा केला. मात्र चेंडू लेग स्टंप लाईनच्या बाहेर असल्यामुळे रोहित थोडक्यात बचावला आणि अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला. तिसऱ्या अंपायरने आपला निर्णय सांगितल्यानंतर रोहितलाही हसू आवरलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी अर्धशतकी खेळी केली. शेवटी सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली. या खेळीच्या बळावर मुंबईने २१७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचा डाव अवघ्या ११७ धावांवर आटोपला. यासह मुंबईने हा सामना १०० धावांनी आपल्या नावावर केला.