Rajasthan Royals vs Delhi Capitals Match Updates : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स, ज्याने आयपीएल २०२४ च्या हंगामाची सुरुवात पंजाब किंग्ज विरुद्ध पराभवाने केली होती, त्यांची नजर गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विजयाकडे असेल. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. गेल्या सामन्यात दिल्लीला चार विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच राजस्थानने पहिल्या सामन्यात लखनऊचा २० धावांनी जिंकला होता. आता राजस्थान आणि दिल्ली आपल्या दुसऱ्या सामन्यात एकमेकांसमोर असणार आहेत.

दिल्लीसमोर सॅमसनला रोखण्याचे आव्हान –

राजस्थानने लखनऊच पराभव करून १७व्या हंगामाची सुरुवात केली. त्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार सॅमसनने शानदार अर्धशतक झळकावले. लखनऊविरुद्ध सॅमसन ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, ते पाहून तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत होते. अशा स्थितीत सॅमसनला रोखणे दिल्लीच्या गोलंदाजांसमोर आव्हान असेल. राजस्थानचा कर्णधार म्हणून सॅमसनचा रेकॉर्डही चांगला आहे. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १४५ राहिला आहे. वीरेंद्र सेहवागनंतर आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा सर्वोच्च स्ट्राईक रेट आहे. सेहवागचा स्ट्राईक रेट 168 होता.

जयपूरची खेळपट्टी कोणाला साथ देईल?

जयपूरमधील सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. मागच्या सामन्यातही इथे खूप धावा पाहायला मिळाल्या. पण इथे गोलंदाजांनाही मदत मिळते. नवीन चेंडूचा येथे गोलंदाजांना खूप फायदा होतो. मात्र, चेंडू हलका आणि जुना झाला की तो बॅटवर सहज येऊ लागतो. त्यामुळे येथे उच्च स्कोअरिंग सामने पाहायला मिळतात.

हेही वाचा – IPL 2024 : हेनरिचला ‘क्लास’ खेळीसाठी सनरायझर्स हैदराबादकडून मिळाले खास ‘गिफ्ट’, PHOTO होतोय व्हायरल

दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड –

आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये २७ सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत राजस्थान रॉयल्सने १४ सामने जिंकले आहेत, तर १३ सामने दिल्ली कॅपिटल्स संघाने जिंकले आहेत. त्याचबरोबर जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये ६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ४ सामने राजस्थान रॉयल्सच्या जिंकले आहेत, तर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद.

हेही वाचा – IPL 2024 : हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्याने दिली प्रतिक्रिया, सांगितले मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युजवेंद्र चहल.