IPL 2025 CSK vs RCB Ruturaj Gaikwad Big Statement After Defeat: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सांघिक खेळीच्या जोरावर सीएसकेचा अभेद्य किल्ला असलेल्या चेपॉकचं चक्रव्यूह भेदलं आहे. आरसीबीने १७ वर्षांनंतर चेपॉकच्या मैदानावर ५० दणदणील विजयाची नोंद केली. कर्णधार रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १९६ धावांची मजल मारली. चेन्नईचा ५० धावांनी मोठा पराभव झाला आहे. पण सीएसकेचा कर्णधार या पराभवानंतरही आनंदी असल्याचे त्याने म्हटलं आहे.
आरसीबीने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ १४६ धावाच करू शकला. ज्यामुळे आरसीबीला५० धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. सीएसकेला या सामन्यात खराब फिल्डिंगचा मोठा फटका बसला, या उल्लेख कर्णधार ऋतुराज गायकवाडने देखील सामन्यानंतर केला.
सीएसकेच्या पराभवानंतर बोलताना कर्णधार ऋतुराज म्हणाला, “माझ्या मते, ही खेळपट्टी पाहता अजूनही एकूण १८० धावा पुरेश्या होत्या. पण जेव्हा एकूण धावसंख्या पार स्कोअरपेक्षा २० धावा जास्त असेल आणि खेळपट्टीही अनुकूल नसेल तर तेव्हा पॉवरप्लेमध्ये संघाच्या हितासाठी वेगळं काहीतरी करणं महत्त्वाचं असत. पण दुसऱ्या डावात विकेट मंदावली होती आणि चेंडू थांबून येत होता. राहुलने त्याचा शॉट खेळला, मीही माझ्या नेहमीच्या फटकेबाजीसह फटका खेळला. कधी कधी हे फटके कामी येतात तर कधी कधी त्यांचा फटका बसतो.”
सीएसकेच्या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड नेमकं काय म्हणाला?
ऋतुराज म्हणाला, “जर संघासमोर निश्चित धावांपेक्षा जास्त धावसंख्या असेल तर सुरूवातीपासूनच सामन्यात एक पाऊल पुढे राहावं लागतं, पण आम्ही यात मागे पडलो. पण मी अजूनही खूश आहे की आम्ही मोठ्या फरकाने सामना गमावला नाही, शेवटी फक्त ५० धावांनीच पराभूत झालो. संघात जेव्हा ३ वर्ल्डक्लास फिरकीपटू असतात तेव्हा इम्पॅक्ट वेगळा असतो.”
पुढे ऋतुराज म्हणाला, “आम्ही मोक्याच्या क्षणी काही विकेट्स गमावले आणि त्यानंतर समोरून मोठे फटके खेळले गेले. यानंतर त्यांनी लय कायम ठेवली आणि अखेरच्या षटकापर्यंत ती कायम होती. संघाला क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.” ऋतुराजच्या फक्त ५० धावांनी हरलो, या वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे ऋतुराज गायकवाड चांगलाच ट्रोल होत आहे. RCB चा संघ या विजयानंतर +2.266 च्या सर्वाेत्कृष्ट नेट रन रेटसह आणि ४ गुणांसह आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे.
आरसीबीसाठी फिल सॉल्टने १६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह ३२ धावा केल्या. यानंतर कर्णधार रजत पाटीदारने ३२ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. तर टीम डेव्हिडने अखेरच्या षटकात तीन षटकार लगावत संघाला १९६ धावांचा टप्पा गाठून दिला. यानंतर आरसीबीकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक तीन विकेट घेतले. तर यश दयाल आणि लियाम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्यामुळे चेन्नईचा संघ केवळ १४६ धावा करू शकला आणि या मोसमातील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.