Sai Sudarshan Breaks Sachin Tendulkar Record: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ५१ वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यातही गुजरात टायटन्सच्या सलामी जोडीने गुजरातला वादळी सुरुवात करून दिली. यादरम्यान साई सुदर्शनने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत अग्रगण्य स्थानी असण्याचं प्रमुख कारण, त्यांची सलामी जोडी आहे. शुबमन गिल आणि साई सुदर्शनच्या जोडीने अनेकदा संघाला चांगली सुरुवात करून दिली. सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्धच्या सामन्यातही या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी पावरप्लेच्या षटकात ८२ धावा चोपल्या. ही गुजरात टायटन्स संघाची पावरप्लेच्या षटकांमध्ये केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे.

सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला

या डावात फलंदाजी करताना साई सुदर्शनने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. या डावात त्याने आयपीएलमध्ये २००० धावा करण्याचा कारनामा केला आहे. हा कारनामा त्याने ५४ व्या डावात करून दाखवला आहे. यासह सर्वात जलद २००० धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत शॉन मार्श अव्वल स्थानी आहे. त्याने हा कारनामा ५३ व्या डावात केला होता. तर सचिन तेंडुलकरने हा कारनामा ५९ व्या डावात केला होता. आता साई सुदर्शनने या रेकॉर्डमध्ये सचिनला मागे सोडलं आहे.

साई सुदर्शनच्या ५०० धावा पूर्ण

आयपीएल २०२५ स्पर्धेत साई सुदर्शनच्या फलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. हा युवा फलंदाज ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव सारख्या अनुभवी फलंदाजांना तोडीस तोड टक्कर देत आहे. साई सुदर्शनने हैदराबादविरूद्धच्या सामन्यात ४८ धावांची खेळी केली. त्याचं अर्धशतक अवघ्या २ धावांनी हुकलं. यादरम्यान त्याने आयपीएल २०२५ स्पर्धेत ५०० धावांचा आकडा गाठला आहे. असा कारनामा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांना देखील आयपीएल २०२५ स्पर्धेत ५०० धावांचा आकडा गाठता आलेला नाही.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता साई सुदर्शन अव्वल स्थानी पोहोचला आहे. साई सुदर्शनच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १० सामन्यांमध्ये ५०४ धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवने ११ सामन्यांमध्ये ४७५ धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहलीने १० सामन्यांमध्ये ४४३ धावा केल्या आहेत. गुजरातचा कर्णधार शुभमन गिल या यादीत चौथ्या स्थानी आहे. तर ४३९ धावांसह यशस्वी जैस्वाल पाचव्या स्थानी आहे.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप ५ फलंदाज

साई सुदर्शन – ५०४ धावा
सूर्यकुमार यादव – ४७५ धावा
विराट कोहली – ४४३ धावा
शुबमन गिल – ४४१ धावा
यशस्वी जैस्वाल –४३९ धावा

गुजरातने उभारला २२४ धावांचा डोंगर

या सामन्यात हैदराबादने गुजरातला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २२४ धावांचा डोंगर उभारला आहे. गुजरात टायटन्सकडून शुबमन गिलने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. तर साई सुदर्शनने ४८ धावा केल्या. शेवटी जोस बटलरने ६४ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली.