कोलकाता नाईट रायडर्स संघ आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. दशकभरानंतर केकेआरेने आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. यानंतर कोलकाताच्या ताफ्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. या हंगामात केकेआर संघ अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत होता. केकेआर संघाच्या प्रत्येक खेळाडूने चमकदार कामगिरी करत कोलकाता संघाने तिसऱ्यांदा अंतिम ट्रॉफी जिंकली.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या रचण्याचा विक्रम आपल्या नावे असलेला हैदराबादचा संघ अंतिम फेरीत सपशेल फेल ठरला. अवघ्या ११३ धावांवर संपूर्ण संघ गारद झाला. यानंतर केकेआर संघ बॅटनेही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. फायनल जिंकल्यानंतर केकेआरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यापैकी शाहरूख खान आणि गौतम गंभीरच्या व्हीडिओने सर्वांच लक्ष वेधलं आहे.

केकेआरने अंतिम सामना जिंकल्यानंतर सगळेच खूश दिसत होते. दरम्यान, केकेआर संघाचा मालक शाहरुख खानही मैदानावर उपस्थित होता. शाहरुख खानचा संपूर्ण परिवार या सामन्यासाठी चेन्नईमध्ये आला होता. संघाच्या विजयानंतर शाहरूख खूप आनंदी दिसत होता. त्याने केकेआरच्या सर्व खेळाडूंची आणि कोचिंग स्टाफची भेट घेतली. नंतर त्याने केकेआरचा मार्गदर्शक गौतम गंभीरला मिठी मारली. यानंतर शाहरुख खानने गंभीरच्या कपाळावर किस केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गौतम गंभीर यंदाच्या आयपीएलसाठी केकेआर संघात मेंटॉर म्हणून परतला. त्यानंतर संघाने वेगळा खेळ दाखवला आणि ट्रॉफी जिंकण्यातही संपूर्ण संघाने आपले १०० टक्के योगदान दिले. त्यामुळे आता गौतम गंभीरला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवण्याच्या चर्चेला वेग आला आहे. केकेआरच्या विजयानंतर गंभीरने बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांची भेट घेतली, त्याचेही फोटो व्हायरल होत आहेत.

२०२४ च्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाने अप्रतिम कामगिरी केली. कोलकाता संघाने या हंगामात १७ पैकी १४ सामने जिंकून ट्रॉफीही आपल्या नावे केली. कोलकाता संघाच्या या शानदार प्रदर्शनाचे कारण म्हणजे सर्व खेळाडूंनी मिळून केलेली चांगली कामगिरी. या हंगामात केकेआरच्या ५ गोलंदाजांनी १५ हून अधिक विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. तर एका गोलंदाजाने १० विकेटस आपल्या नावे केल्या आहेत. केकेआरच्या सर्व गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. फलंदाजीतही चार फलंदाजांनी ३५० पेक्षा जास्त धावा केल्या, गोलंदाजी आणि फलंदाजीने शानदार कामगिरी करत केकेआर संघाला विजय मिळवून दिला.