Shreyas Iyer: कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर २०२३ च्या विश्वचषकानंतर तो त्याच्या पाठीच्या दुखापतीशी झुंजत होता. पण “कोणीही यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते”, असे त्याने केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. विश्वचषकानंतर श्रेयसची इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली होती, परंतु पाठीच्या दुखापती मुळे शेवटच्या तीन सामन्यांसाठी श्रेयसला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) खेळण्याची परवानगी देऊनही श्रेयसने मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळला नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्याला केंद्रीय करारातूनही बाहेर केले.

२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताला अंतिम फेरीत नेण्यात श्रेयस अय्यरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मानंतर तो संघात सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. कोणत्याही विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याची कामगिरी सर्वोत्तम होती.

आता आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यापूर्वी मीडियाशी बोलताना श्रेयसने यावर मोठे वक्तव्य दिले. अय्यर कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व करत आहे आणि संघ तिसरे विजेतेपद जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. भारतीय स्टार खेळाडूने कबूल केले की त्याला कसोटीमध्ये काही समस्यांचा सामना करावा लागला, परंतु नंतर त्याचे संपूर्ण लक्ष आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यावर होते.

हेही वाचा – IPL 2024 Finalवर पावसाचे सावट, KKR vs SRH मधील अंतिम सामना रद्द झाल्यास कोण पटकावणार ट्रॉफी? कसं आहे समीकरण

“विश्वचषक स्पर्धेनंतर मी निश्चितपणे कसोटी फॉरमॅटमध्ये संघर्ष करत होतो. जेव्हा याबाबत मी चिंता व्यक्त केली तेव्हा कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण त्यावेळेस माझी स्पर्धा माझ्याशीसुध्दा होती.” असं श्रेयस म्हणाला. पुढे सांगताना केकेआरचा कर्णधार म्हणाला, “जेव्हा आयपीएल जवळ येत होते, तेव्हा माझे पूर्ण लक्ष माझी सर्वोत्तम कामगिरी करण्यावर होते. ज्यामध्ये आम्ही आमच्या योजना आणि रणनीती अंमलात आणण्यात यशस्वी झालो आणि आता आमचं पूर्ण लक्ष अंतिम सामन्यावर आहे.”

आयपीएलचा हा मोसम सुरू होण्याआधी अय्यर पाठीच्या दुखापतीशी झुंजत होता, त्यामुळे त्याच्या खेळण्यावर शंका निर्माण झाली होती. मात्र, अय्यर वेळेवर तंदुरुस्त झाल्याने तो केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडताना दिसला. त्यावेळी श्रेयस अय्यरला रणजी ट्रॉफी सामना न खेळल्यामुळे बीसीसीआयने केंद्रीय करारातून वगळले होते. त्यानंतर त्याच्या पाठीच्या दुखापतीची बरीच चर्चा झाली होती. अय्यर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळला नाही. परंतु त्यानंतर विदर्भाविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो मुंबई संघाकडून खेळला आणि दुसऱ्या डावात त्याने ९५ धावा केल्या.

आयपीएलच्या १७ व्या मोसमात अय्यरच्या फलंदाजीच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने १३ सामन्यात ३८.३३ च्या सरासरीने ३४५ धावा केल्या आहेत.