Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Highlights: आयपीएल २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला सूर गवसला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायजझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजयासाठी १४४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

मुंबई इंडियन्सला या हंगामात हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. मात्र, गेल्या चारही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने विजयाची नोंद केली आहे. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मागे सोडत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. यासह मुंबईचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकण्यासाठी १४४ धावा करायच्या होत्या. मुंबईची बॅटिंग लाईनअप पाहता, हे आव्हान फार मोठं नव्हतं. मुंबईकडून डावाची सुरूवात करण्यासाठी रायन रिकल्टन आणि रोहित शर्माची जोडी मैदानावर आली. रायन रिकल्टनला या डावात चांगली सुरूवात करून देता आली नाही. तो अवघ्या ११ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर रोहित शर्माने एक बाजू धरून ठेवली. रोहितने ४६ चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि ३ चौकारांच्या साहाय्याने ७० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबईने सामन्यावर पकड मजबूत केली. विल जॅक्सने २ षटकार आणि १ चौकाराच्या साहाय्याने २२ धावांची खेळी केली. शेवटी सूर्यकुमार यादवने १९ चेंडूंचा सामना करत नाबाद ४० धावांची खेळी केली आणि संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.

या सामन्यात सनरायझर्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी आला होता. मात्र या संघाला हवी तशी सुरूवात करता आली नाही. पावरप्लेमध्ये तुफान फटकेबाजी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादला मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी लागोपाठ धक्के दिले. पावरप्लेमध्येच हैदराबादचे ४ प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते. हैदराबाद हेनरिक क्लासेनने एकेरी झुंज दिली. त्याने ४४ चेंडूंचा सामना करत ७१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या १४३ पर्यंत पोहोचवली.

मुंबईची इंडियन्सची टॉप ४ मध्ये एन्ट्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विजयासह मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईने गेल्या चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. ९ सामन्यांपैकी ४ सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर ५ विजयासह मुंबईचा संघ १० गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत गुजरातचा संघ १२ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर दिल्लीचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईच्या विजयानंतर बंगळुरूचा संघ चौथ्या स्थानी सरकला आहे.