अभिनेते, उद्योगपती सुनील शेट्टी आणि त्यांचे जावईबापू क्रिकेटपटू के.एल.राहुल आयपीएल हंगामात चक्क एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. चक्रावून गेलात ना? सगळेचजण हे पाहून चकित झालेत. आयपीएलचा सतरावा हंगाम आजपासून सुरू झाला. सुनील शेट्टी पक्के मुंबईकर तर त्यांचा जावई राहुल पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करतोय. नेमकं हेच त्यांच्या बेबनावाचं कारण ठरलं आहे. आयपीएल जाहिरातींच्या निमित्ताने नेमकं काय घडलंय ते समजून घेऊया.

स्थळ- पंचतारांकित हॉटेलातलं जेवणाचं टेबल

सुनील शेट्टी आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा जेवायला बसलेले असतात. तेवढ्यात पंजाब संघाचा कर्णधार के.एल.राहुल तिथे येतो. तो बसणार. तेवढ्यात रोहित शर्मा त्याला म्हणतो, ‘तू इथे काय करतो आहेस. फॅमिली डिनर सुरू आहे’.

राहुल सासरेबुवा अर्थात सुनील शेट्टी यांच्याकडे पाहून म्हणतो, पापा.

सुनील शेट्टी म्हणतो, ‘नो पापा. जब तक टूर्नामेंट ऑन है, शर्माजीका बेटा मेरा बेटा’.

राहुल सुनील शेट्टीच्या या बोलण्याने हताश होऊन दोघांकडे पाहतो. तेवढ्यात सुनील शेट्याने काट्याने सफरचंदाची एक फोड घेतात आणि रोहित शर्माला भरवतात.

कसं आहे विचारतात? तो हाताने मस्त असल्याचं दाखवतो आणि राहुल निराशेने निघून जातो.

आयपीएलचा माहोल दर्शवणारी ही धमाल जाहिरात सध्या व्हायरल झाली आहे. सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी आणि के.एल.राहुल यांचं लग्न झालं आहे. सुनील शेट्टी हे फिटनेसप्रेमी आणि क्रिकेटरसिक म्हणून ओळखले जातात. भारतीय संघाचा भाग असलेला खेळाडूच जावई म्हणून त्यांना लाभलं आहे. पण ते मुंबईत राहतात. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मुंबई इंडियन्स संघाला असेल हे दाखवणारी ही मजेशीर जाहिरात.

रोहित शर्मा यंदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाच्या भूमिकेत नसेल. मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने कर्णधारपद हार्दिक पंडयाकडे सोपवलं आहे. हार्दिक प्रदीर्घ काळ मुंबई इंडियन्स संघाचाच भाग होता. मात्र गेले दोन हंगाम तो गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करत होता. गुजरात टायटन्स संघाला पदार्पणाच्या हंगामातच त्याने जेतेपद मिळवून दिलं. गेल्या वर्षीही गुजरात टायटन्सचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला. शेवटच्या षटकांपर्यंत सामन्याचं पारडं गुजरातच्या बाजूने होतं. पण रवींद्र जडेजाच्या चौकार आणि षटकाराने चेन्नईने थरारक विजय मिळवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूळचा बंगळुरूचा राहुल आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि आता लखनौ सुपर जायंट्स संघांसाठी खेळला आहे. आयपीएल स्पर्धेत राहुलच्या नावावर ११८ सामन्यात ४१६३ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतकं आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. राहुलच्या नावावर आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक आहे. त्याने १४ चेंडूत अर्धशतकी खेळी साकारली होती. राहुलने पंजाब आणि आता लखनौच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली आहे. विकेटकीपिंग, नेतृत्व आणि सलामी अशी तिहेरी जबाबदारी राहुल हाताळतो.