Sunrisers Hyderabad broke RCB’s record : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या नोंदवत इतिहास रचला आहे. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला विजयासाठी २७८ धावांचे लक्ष्य दिले. या दरम्यान हैदराबादने आरसीबीचा २०१३ मधील २६४ धावांचा विक्रम मोडला. हैदराबादने २० षटकांत ३ गडी गमावून २७७ धावा केल्या. हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने नाबाद ८० धावा केल्या. त्याने ३४ चेंडूंचा सामना करताना ७षटकार आणि ४ चौकार लगावले. अभिषेक शर्माने ६३ आणि ट्रॅव्हिस हेडने ६२ धावा केल्या. मार्करमने नाबाद ४२ धावांचे योगदान दिले.

आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या –

यापूर्वी, आयपीएलमधील डावांची सर्वाधिक धावसंख्या २६३ धावा होती. २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पुणे वॉरियर्सविरूद्ध हा पराक्रम केला होता. मागील हंगामात, लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जविरूद्ध २५७ धावा केल्या होत्या. आयपीएल २०१६ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात लायन्सविरुद्ध २४८ धावा केल्या होत्या. २०१० मध्ये चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सविरुद्ध २६६ धावांची नोंद केली होती.

आयपीएलमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या –

२७७/३ – एसआरएच विरुद्ध एमआय, हैदराबाद, २०२४
२६३/५ – आरबीसी विरुद्ध पुणे वॉरियर्स, बंगळुरू, २०१३
२५७/५ – एलएसजी विरुद्ध पीबीकेएस, मोहाली, २०२३
२४८/३ – आरसीबी विरुद्ध जीएल, बेंगळुरू, २०१६
२४६/५ – सीएसके विरुद्ध आरआर, चेन्नई, २०१०

हेही वाचा – IPL 2024 : कोण आहे १७ वर्षीय क्वेना माफाका? मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरताच रचला इतिहास

हैदराबादची झंझावाती सुरुवात –

प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर मयंक अग्रवाल आणि ट्रॅव्हिस हेडने येताच चौकारांचा पाऊस पाडला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. हार्दिक पंड्याने ही भागीदारी ५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोडली. त्याने मयंक अग्रवालला टीम डेव्हिडकरवी झेलबाद केले. मयंकने १३ चेंडूत ११ धावा केल्या. यादरम्यान त्याने १ चौकारह मारला.

अभिषेक शर्माने १६ चेंडूत अर्धशतक ठोकले –

ट्रॅव्हिस हेडने अभिषेक शर्मासह डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २३ चेंडूत ६८ धावांची भागीदारी केली. आठव्या षटकात जेराल्ड कोएत्झीने हेडची विकेट घेतली. हेडने २४ चेंडूत ६२ धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने आपल्या बॅटमधून ९ चौकार आणि ३ षटकार मारले. यानंतर अभिषेक शर्मा आणि एडन मार्कराम यांच्यात ४८ धावांची भागीदारी झाली. पियुष चावलाने ११व्या षटकात अभिषेकची शिकार केली. त्याने २३ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या.